Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी राममंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हा शुभ दिवस असल्याने या दिवसाची सुरुवात चांगली करावी. तसेच हा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे. यातूनच आता बिहार राज्यातील गर्भवती महिलांनी त्यांची प्रसूती ही २२ जानेवारी रोजी करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या या मागणीमुळे डॉक्टर देखील चक्रावले आहेत.
राम मंदिराच्या कामावरून संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत २२ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात या सोहळ्याची तयारी सुरू आहे. अनेक नागरीक या दिवशी अयोध्या येथे जाणार आहेत. हा दिवस कायम आठवणीत राहण्यासाठी काहींची धडपड आहे. याच धडपडीतून गर्भवती महिलांनी २२ जानेवारी रोजी प्रसूतीची मागणी केली आहे.
बिहार ओब्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील १०० हून अधिक महिलांनी वेगवेगळ्या महिला डॉक्टरांशी संपर्क साधत ही मागणी केली आहे. विनंती केलेल्या सर्व गर्भवती महिला २२ जानेवारीलाच सिझेरिअन पद्धतीने प्रसूती करण्यासाठी तयार झाल्या आहेत. २२ जानेवारी हा दिवस अतिशय शुभ असल्याचे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानत आहेत. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार असल्याने या शुभ दिवशी आपल्या कुटुंबातील नवीन सदस्य या जगात यावा अशी त्यांची इच्छा आहे.
भगवान श्रीरामाचे २२ जानेवारीला अयोध्या शहरात आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरात येणाऱ्या नवीन सदस्यामध्येही प्रभू रामसारखे गुण असतील, असा त्याचा विश्वास आहे. त्यामुळे ही आगळी वेगळी मागणी केली जात आहे. स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. अमृता राय यांनी सांगितले की, अनेक महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून २२ जानेवारी रोजी प्रसूतीसाठी विनंती केली आहे. प्रत्येकीलाच आपल्या मुलाचा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा असे वाटते. त्यामुळे गरोदर महिलांनी या विशेष तारखेला प्रसूतीसाठी विनंती केली आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, गरभवित महिलांच्या या मागणीला अनेक महिला डॉक्टरांनी विरोध केला आहे. असे करणे आई आणि बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. गरोदर महिलांनी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता योग्य वेळेवर बाळाला जन्म द्यावा, असे केल्याने दोघांचेही आरोग्य चांगले राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या