Kalaburagi Ola showroom fire : विक्रीनंतरच्या सर्व्हिसच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिकला सातत्यानं अडचणी येत आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या खराब सर्व्हिसिंगला कंटाळून याआधी अनेक ग्राहकांनी ओला इलेक्ट्रिकच्या वाहनांंना लक्ष्य केलं आहे. कधी तोडफोड तर कधी निदर्शनं झाली आहेत. मात्र, कर्नाटकमधील एका घटनेनं यापुढचं टोक गाठलं आहे.
नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बिघाडानंतर योग्य सेवा मिळत नसल्यामुळं कर्नाटकातील कलबुर्गी इथं एका व्यक्तीनं ओलाच्या शोरूमला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद नदीम असं या व्यक्तीचं नाव आहे. नदीमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नदीमनं महिन्याभरापूर्वी १.४० लाख रुपयांची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती, पण एक-दोन दिवसांनी त्यात अडचणी येऊ लागल्या. तो अनेक वेळा शोरूममध्ये गेला, पण त्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं तो संतापला आणि रागाच्या भरात शोरूमला आग लावली. ही आग शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, हा अपघात नसून नदीमचं कृत्य असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तसंच, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
ही घटना मंगळवार, १० सप्टेंबर रोजी घडली. मोहम्मद नदीम त्याच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमधील बिघाडामुळं वैतागला होता. शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडं अनेकदा तक्रार करूनही मदत मिळाली नाही. शोरूममधील ग्राहक सेवा अधिकाऱ्यांशी त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यानं पेट्रोल टाकून शोरूमला आग लावली. या आगीत ६ वाहनं आणि संगणक प्रणाली जळून खाक झाली. नदीम हा व्यवसायानं मेकॅनिक आहे. त्यानं खरेदी केलेल्या स्कूटरमध्ये अवघ्या २ दिवसांत बॅटरी आणि साउंड सिस्टममध्ये तांत्रिक समस्या येऊ लागल्या.
आगीत संपूर्ण शोरूम जळून खाक झाला आहे. आगीमुळं दुकानातून धुराचे लोट उसळत होते. या घटनेत कंपनीचं अंदाजे साडेआठ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सुदैवानं आग लावली गेली तेव्हा शोरूम बंद असल्यानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.