मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Died Snake Appeared In Mid Day Meal At Primary School In Farbisganj Bihar See Details

Mid Day Meal : जेवणात साप निघाल्याने शाळेत खळबळ, २४ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली; पोलीस घटनास्थळी दाखल

Mid Day Meal Forbesganj Bihar
Mid Day Meal Forbesganj Bihar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 27, 2023 02:28 PM IST

Mid Day Meal : शाळेतील माध्यान्ह भोजनात मेलेला साप निघाल्याने अनेक विद्यार्थी आजारी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mid Day Meal Forbesganj Bihar : प्राथमिक शाळेतील माधान्ह भोजनात मेलेला साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शाळेतील असंख्य विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिहारमधील फारबिसगंज शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. शाळेतील २४ मुलं आजारी पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अररियाचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि अन्न व औषध पुरवठा विभागातील अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथील अमौन प्राथमिक शाळेत मुलांना नेहमी प्रमाणे माध्यान्ह भोजन देण्यात येत होतं. विद्यार्थी जेवण करत असताना एकाच्या ताटात चक्क मेलेला साप आढळून आला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाची माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यातच काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या होण्यास सुरुवात झाली तर काही मुलं चक्कर येवून खाली पडली. त्यानंतर मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीनं फारबिसगंज येथील रुग्णालयात दाखल केलं. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली.

जेवणात साप निघाल्याने विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर फारबिसगंज येथील अनेक पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त पालकांना शांत केलं. त्यानंतर आता शाळा प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या छपरा जिल्ह्यातील एका शाळेतील जेवणात पाल सापडली होती. त्यानंतर तब्बल ३५ विद्यार्थी आजारी पडले होते. त्यानंतर आता अररिया जिल्ह्यातही अशीच घटना समोर आल्यामुळं बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

WhatsApp channel

विभाग