Atal Bihari Vajpayee On Indira Gandhi : आज म्हणजेच २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. भारतीय राजकारणातील प्रखर वक्ते, कुशल नेते आणि संवेदनशील कवी म्हणून त्यांचं स्मरण केलं जातं. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख 'दुर्गा' असा केला होता. याबाबतचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा केला आहे. पण हे खरं आहे का? खरचं अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटलं होतं का जाऊन घेऊयात.
अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीरपणे इंदिरा गांधींची स्तुती केली आणि त्यांना 'दुर्गा' ही उपाधी दिली, असे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सांगतात. काँग्रेसच्या प्रचारात, विशेषत: इंदिरा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत हे विधान अनेकदा वापरलं जातं. २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देत इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. आपले माजी आणि अभूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना देवी दुर्गाशी केली होती.
भाजपच्या विरोधी पक्षांच्या, प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा या घटनेचा दाखला दिला आहे. मात्र, अनेकदा भाजपच्या बड्या नेत्यांनी हे विधान फेटाळून लावत वाजपेयी यांनी असे कधीच म्हटले नसल्याचे म्हटले आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनीही याचा इन्कार केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना कधीही 'दुर्गा' म्हटले नाही. हे विधान प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंह यांनी केले होते.
खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत इंदिरा गांधींना दुर्गा म्हटले नाही, असे म्हटले होते. इंडिया टीव्हीचे रजत शर्मा यांच्यासमवेत जनता की अदालत कार्यक्रमात बोलताना वाजपेयी म्हणाले की, मी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटलं नाही. या बाबत मी अनेक वेळा बोललो आहे. मात्र, हे वर्तमानपत्रांनीही प्रसिद्ध केलं होतं. श्रीमती पुपुल जयकर यांनी इंदिराजींवर एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात मी त्यांना दुर्गा संबोधलं होतं, या बाबतच उल्लेख त्यांना पुस्तकात करावासा वाटला. या संदर्भात माहिती विचारण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी तसं बोललो नाही. मात्र, माझ्या नावाने ते छापले गेले. यानंतर त्या देखील या प्रकरणाच्या मुळाशी गेल्या. त्यांनी अनेक पुस्तक चाळली. वर्तमान पत्र तपासली, पण मी असे बोलल्याचे त्यांना आढळले नाही. असे असले तरी, दुर्गा अजूनही माझ्या मागे आहे. तुमच्या प्रश्नाप्रमाणे. " अटल बिहारी यांच्या या उत्तरामुळे हशा पिकला होता.
१९७१ च्या युद्धानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होतं. पण त्यांनी त्यांच्यासाठी 'दुर्गा' हा शब्द वापरला नव्हता. वाजपेयी नेहमीच आपल्या स्पष्ट आणि संतुलित बोलीसाठी ओळखले जायचे. त्यांनी इंदिरा गांधींवरही टीका केली आणि योग्य वाटल्यावर त्यांचे कौतुक देखील केले आहे. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना 'दुर्गा' म्हटले नव्हते, हे स्पष्ट आहे.
संबंधित बातम्या