dhruv helicopter emergency landing in arabian sea : भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात आज इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या घटनेत हेलिकॉप्टरमधील भारतीय तटरक्षक दलाचे दोन वैमानिक बेपत्ता झाले आहेत. या सोबतच एक डायव्हरही बेपत्ता झाला आहे. त्यांचा अद्याप शोध लागेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधील एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, इतर तिघे जण बेपत्ता आहेत. हे हेलिकॉप्टर गुजरातमधील पुरग्रस्तांच्या मदत व बचाव कार्यात गुंतलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सोमवारी रात्री हेलिकॉप्टरने पोरबंदरजवळील समुद्रात आपत्कालीन लँडिंग केलं.
या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि दोन डायव्हर होते. आतापर्यंत एका गोताखोराची ओळख पटली आहे. तर उर्वरित तीन जण बेपत्ता आहेत. गुजरातमधील पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आणि मदत सामग्री पोहोचवण्यात हे हेलिकॉप्टर व्यस्त होते. हेलिकॉप्टर व बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाने ४ जहाजे आणि दोन विमानं तैनात केली आहेत. गुजरातमधील पूर आणि चक्रीवादळात आतापर्यंत भारतीय तटरक्षक दलाच्या लाईट हेलिकॉप्टरच्या साह्याने ६७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. तटरक्षक दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. वैद्यकीय बचावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते.
इमर्जन्सी लँडिंगनंतर या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला. तेव्हा एका डायव्हरला वाचवण्यात आले. हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले आहेत, मात्र उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. हेलिकॉप्टर एका जहाजापर्यंत पोहोचत असताना हा अपघात झाला. इमर्जन्सी लँडिंगचे कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानंतरच तटरक्षक दलाकडून यासंदर्भात निवेदन जारी केले जाऊ शकते. सध्या केवळ बेपत्ता वैमानिक आणि एका डायव्हरचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडकडून या हेलिकॉप्टरच्या अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू असताना हा अपघात झाला. गेल्या वर्षी अनेक ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर या हेलिकॉप्टरचे अपग्रेशन केले जात होते. तज्ज्ञांच्या मते ध्रुव हेलिकॉप्टरच्या डिझाइनमुळेही अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या वर्षी अनेक हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले होते. त्यांच्यासोबत घडणाऱ्या अनेक अपघातांमुळे सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिकलकडून सध्या या हेलिकॉप्टरचा आढावा घेतला जात आहे.