Tiruporur Kandasamy Temple: तामिळनाडूतील चेन्नईजवळील तिरुपुरूर कंदासमी मंदिर हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. अलीकडेच या मंदिरात एक विचित्र घटना घडली. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भक्ताचा आयफोन चुकून दानपेटीत पडला. त्यानंतर या भक्ताने मंदिर प्रशासनाकडे दानपेटीत पडलेला आयफोन परत मागितला. परंतु, मंदिर प्रशासनाने नकार दिला. हा आयफोन देवाला दान झाल्याचे त्यांनी म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायकपुरम येथे राहणारा दिनेश महिनाभरापूर्वी पत्नी आणि मुलांसह मंदिरात आला होता. मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ते दानपेटीत पैसे टाकण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या हातातून आयफोन निसटून दानपेटीत पडला. दिनेश यांनी दानपेटीत पडलेला आयफोन काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. यानंतर दिनेशने मंदिराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर ऐकून दिनेश यांनाही धक्का बसला. अधिकाऱ्याने म्हटले की, दानपेटीत टाकलेली वस्तू देवाची संपत्ती मानली जाते आणि ती परत करता येत नाही. एवढेच नव्हेतर, परंपरेनुसार, मंदिरातील दानपेटी दोन महिन्यातून एकदा उघडली जाते.
दिनेश यांनी हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डॉवमेंट एचआर आणि सीई अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि दानपेटी कधी उघडणार? अशी विचारणा केली. अखेर शुक्रवारी जेव्हा मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दानपेटी उघडली, तेव्हा दिनेश त्याचा फोन घेण्यासाठी धावला. परंतु, त्याला सांगण्यात आले की, हा फोन मंदिराकडेच राहील. तसेच दिनेश यांना सिमकार्ड काढून फोनमधून महत्त्वाचा डेटा डाउनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला होता.
दिनेशने आधीच नवीन सिमकार्ड घेतले होते आणि फोन परत करण्याच्या विनंतीवर मंदिराचे अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे तो लक्ष ठेवून होता. पण मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी सांगितले की, दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू मंदिर आणि देवाची संपत्ती होते. परंपरेनुसार, हा फोन मंदिराजवळच ठेवला जाईल. तसेच दिनेश यांनी दान म्हणून आयफोन दानपेटीत टाकला की चुकून पडला, याबाबत अस्पष्टता आहे.
संबंधित बातम्या