संगीतकार प्यारेलाल यांना पद्मभूषण पुरस्कार. बॉलिवूडमधील लक्ष्मीकांत-प्यारेलाल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील एक सदस्य. पूर्ण नाव प्यारेलाल रामप्रसाद शर्मा. जन्म ३ सप्टेंबर १९४०. १९६३ ते १९९८ या काळात ५००हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. ‘मेरे महबूब कयामत होगी’, ‘दर्दे दिल दर्दे जिगर’, ‘जुम्मा चुम्मा दे दे’, ‘ये रेशमी जुल्फे’, ‘लंबी जुदाई…’ ही काही गाजलेली गाणी.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव इथे जन्म. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे', आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार', 'साष्टांग नमस्कार'मधील भूमिका गाजल्या. 'घरची राणी', ‘अपराध’, 'शापित', ‘पुढचं पाऊल’, 'देवकी नंदन गोपाला', ‘सर्जा’सह एकूण २८ चित्रपट आणि १० टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शन.
मुंबई (उत्तर) लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार. १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल.
हृदयविकार तज्ञ डॉ. आश्विन मेहता यांना पद्मभूषण पुरस्कार. डॉ. मेहता सध्या मुंबईतील गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कार्डिओलॉजी विभागात कार्यरत. हृद्यशस्त्रक्रियेतील कोरोनरी इन्टरवेंशन्स, रोटेब्लेशन, बलून व्हाल्वोटॉमील, ट्रान्सकेथेटर एरोटिक व्हल्व रिप्लेसमेंट क्षेत्रात तज्ञ मानले जातात.
जन्मभूमी या गुजराती भाषेतील वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार. सहा दशकांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रेस कौन्सिल, आयएनएस सारख्या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनांमध्ये सक्रिय. १९७१ च्या युद्धाचे युद्धभूमीवर जाऊन वार्तांकन.
मुंबई समाचार वर्तमानपत्राचे कार्यकारी संचालक होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण पुरस्कार. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) चे माजी अध्यक्ष. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) आणि मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिलचे माजी अध्यक्ष होते.
अमरावती जिल्ह्यातील वझर येथे ‘अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचे आश्रमा’च्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. अनेक दिव्यांग मुला-मुलींचे लग्न लावून संसार उभे करून दिले.
आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार. मल्लखांब या खेळाला जागतिक स्तरावर या लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न. मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक मल्लखांबपटू घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी शिक्षणतज्ञ डॉ. झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. डॉ. झहीर काझी हे मुंबईतील अंजुमन-इ-इस्लाम या २०० वर्ष जुन्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ. काझी यांनी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्य केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.