अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यावर बंदी आणण्याची मागणी होत आहे. याबाबत अलाहाबाद हायकोर्टात एकजनहित याचिका दाखल झाली आहे. सांगितले जात आहे की, याचकेमध्ये शंकराचार्यांनी घेतल्या आक्षेपांचा हवाला देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथील भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे. निर्माणाधीन मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिरात पूजा करतील.
पुढे म्हटले आहे की, शंकराचार्यांनी या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. मंदिर अजून पूर्ण झाले नाही. एका अर्धवट बांधलेल्या मंदिरात कोणत्याही देवतेला विराजमान करता येत नाही. या याचिकेत प्राण प्रतिष्ठापनेला सनातन परंपरेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये दावा केले आहे की, भारतीय जनता पार्टीने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
प्राण प्रतिष्ठापनेचे विधी सुरू -
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना समारंभ मंगळवारी सुरू झाला आहे. मंदिर ट्रस्टचे एक सदस्य आणि त्यांची पत्नी या सोहळ्याचे यजमान पद भूषवत आहेत. मंगळवारपासून सुरू धार्मिक विधी रामलल्लाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होईपर्यंत सुरू राहतील.
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी म्हटले की, धार्मिक अनुष्ठान सुरू झाले आहेत व हे २२ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. ११ पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करत अनुष्ठान करत आहेत. या विधीसाठी मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा यजमान आहेत.
संबंधित बातम्या