Birth Control and Abortion Pills: रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला. मात्र, ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली आहे. अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्वात मोठा पुरवठादार एड अॅक्सेसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत १०००० गर्भपाताच्या गोळ्यांचा ऑर्डर प्राप्त झाल्या.
जस्ट द पिल या स्वयंसेवी संस्थेने सांगितले की, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत १२५ ऑर्डरपैकी २२ ऑर्डर गरोदर नसलेल्या लोकांकडून आल्या आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांविषयी माहिती देणाऱ्या प्लॅन सी या जनजागृती प्लॅटफॉर्मने बुधवारी आपल्या वेबसाइटवर ८२ हजार २०० लोकांनी भेट दिल्याची माहिती दिली. निवडणुकीपूर्वी दररोज अंदाजे ४ हजार किंवा ५ हजारांच्या जवळपास लोक वेबसाइटला भेट द्यायचे.
अमेरिकन वृत्तपत्र यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत १ हजार टक्के वाढ झाली. अवघ्या तीन दिवसांत गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी करणाऱ्या लोकांच्या संख्येतही १ हजार ६५० टक्के वाढ झाली. याशिवाय, गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीतही ६०० टक्के वाढ झाली. डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेत गर्भपातासंबंधित कायदे आणखी कडक केले जातील, अशी महिलांमध्ये भिती आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २०२२ अध्ये गर्भपात बेकायदेशीर असल्याचे ठरवले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णायाचे स्वागत केले होते. यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्याने अमेरिकेत गर्भपातासंबंधित कायदे आणखी कडक केले जाण्याची भिती महिलांच्या मनात आहे. यामुळे अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, अनेक कंपन्या टेलीमेडिसिन आणि ऑनलाइन सेवांद्वारे महिलांना घरपोच गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेतील लाखो महिला दुखावल्या आहेत. अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात महिला फोर बी चळवळीत सहभागी होत आहेत. फोर बी चळवळअंतर्गत सेक्स, डेटिंग, लग्न आणि मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला जात आहे. ही चळवळ सुरुवातीला दक्षिण कोरियातून सुरू झाली आणि आता ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत सुरू करण्यात आली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारात ट्रम्प यांना स्त्रीवादविरोधी म्हणून संबोधले होते. यामुळे अनेक महिलांना ट्रम्प यांच्या पराभवाची आशा होती. आता अनेक अमेरिकन महिला सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या विजयाबद्दल निराशा व्यक्त करत आहेत. तसेच फोर बी चळवळीत सामील झाल्याची घोषणा करत आहेत.