Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीची हवा सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. येथील प्रदूषण आणखी वाढत चालले आहे. रविवारी दिल्लीकरांनी या हंगामातील सर्वात प्रदूषित हवेत श्वास घेतला. राजधानीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली. तर १३ परिसराचा हवामान गुणवता निर्देशांक (एक्यूआय) ४५० अंकांच्या पुढे जाऊन धोकादायक पातळीवर (सिव्हिअर प्लस) श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद केल्या आहेत. तर वाहनांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.
राजधानीतील प्रदूषण गेल्या पाच दिवसांत सर्वात वाईट टप्प्यात पोहोचले आहे. धुक्याच्या थरामुळे दृश्यमानतेवर मोठा परिणाम झाला आहे. प्रदूषणामुळे लोकांना श्वसनाचा त्रास, डोळे, घसा आणि नाकात जळजळ अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिल्लीचा एक्यूआय ४४१ होता. शनिवारी तो ४१७ वर होता. तर रविवारी प्रदूषणाची पातळी ४४७ होती, जी या वर्षीची सर्वात वाईट पातळी आहे.
राजधानी दिल्लीत रविवारी सर्वाधिक खराब हवमान नोंदवल्या गेले. हवेत धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. ज्यामुळे रस्त्यावर दृश्यमानता कमी झाली होती. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिमाण झाला असून अनेकांना श्वसनासंबंधी आजार वाढले आहेत.
एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमनुसार, पुढील तीन ते चार दिवस दिल्लीचे हवामान खराब राहणार आहे. तर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १० किलोमीटरपेक्षा कमी राहील. प्रदूषणाचा व्हेंटिलेशन इंडेक्सही सहा हजारांच्या खाली असेल. यातून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही, असे हवामान विभागाने म्हटलं आहे.
एअर क्वालिटी कमिशनने दिल्लीतील सर्वसामान्य जनतेला ग्रेड १, २ आणि ३ सह जारी केलेल्या सिटीझन चार्टरचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तर लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना श्वसनाचे व हृदयाचे इतर आजार आहेत त्यांनी बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी शक्यतो घरातच राहावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
राजधानीत प्रदूषणाची पातळी वाढल्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून ऑनलाइन वर्ग घेण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. नोंदणीकृत हलक्या व्यावसायिक वाहनांना दिल्लीबाहेर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, ईव्ही-सीएनजी आणि बीएस-६ मानकासह डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्याचवेळी डिझेलवर चालणारी मध्यम मालवाहू वाहने आणि दिल्ली बीएस-४ आणि त्यापेक्षा खाली नोंदणीकृत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. एनसीआर आणि दिल्ली सरकार सेवा कार्यालये, नगरपालिका आणि खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाण्याची आज शक्यता आहे. तर उर्वरित लोकांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. याशिवाय महाविद्यालये/शैक्षणिक संस्था बंद करणे, आपत्कालीन नसलेले व्यावसायिक उपक्रम बंद करणे, नोंदणी क्रमांकाच्या सम-विषम तत्त्वावर वाहने चालविण्यास परवानगी देणे यासारख्या अतिरिक्त आपत्कालीन उपाययोजनांचा विचार राज्य सरकार करण्याच्या विचारात आहे.
वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर दिल्लीच्या प्रदूषणातही धुराचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: शुक्रवारी परालीचे प्रमाण ३७ टक्क्यांपर्यंत होते. यापूर्वी १ नोव्हेंबररोजी परालीचा वाटा ३५ टक्क्यांपर्यंत होता. दिल्लीत विविध ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी केलेली व्यवस्था दिसली नाही. आझादपूर बाजार, पंजाबी बाग येथील मुख्य रस्त्यालगतअसलेल्या कचऱ्यासह अनेक जिल्हा उद्याने आणि बेकायदा कचऱ्याचे ढीग जाळले जात असल्याचं देखील दिसलं. महापालिकेच्या अॅप ३११ वर स्थानिक रहिवासी सातत्याने तक्रारी करीत आहेत, मात्र ठोस कारवाई होत नाही असा आरोप केला जात आहे. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी पथके तैनात करण्यात आल्याचा दावा विभागांकडून केला जात आहे.
संबंधित बातम्या