Delhi News: एका २८ वर्षीय महिलेने आपल्या सहा दिवसांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह शेजारच्या घराच्या छतावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. पश्चिम दिल्लीतील ख्याला भागात हा प्रकार घडला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पीसीआर कॉल आला आणि सहा दिवसांची चिमुकली बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, याप्रकरणी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती उघड झाली.
प्राथमिक चौकशीत मुलीची आई शिवानी हिने सांगितले की, आदल्या रात्री तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती आणि ती आपल्या आई- वडिलांच्या घरी परतली. डीसीपी वीर यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री दोन वाजताच्या सुमारास बाळाला दूध पाजल्यानंतर ती बाळाला शेजारी झोपली. परंतु, पहाटे साडेचार वाजता जेव्हा ती उठली, तेव्हा बाळ तिच्या जवळ नव्हते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले.
चौकशीदरम्यान शिवानीने टाके काढण्यासाठी तिला रुग्णालयात जायचे आहे, असे सांगितले. पोलिसांनी तिला जाण्याची परवानगी दिली. परंतु, पोलिसांना तिच्यावर वेगळाच संशय आला. दरम्यान, शोधाशोध केली असता शेजारच्या घराच्या छतावर एक पिशवी आढळून आली. ती उघडल्यावर पोलिसांना त्यात बाळ सापडले. बाळाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी शिवानीची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
शिवानीने प्राथमिक चौकशीत सांगितले की, मृत मुलगी तिची चौथी मुलगी होती. त्यापैकी दोन मुलींचा आधीच मृत्यू झाला आहे. शिवानीला मुलगा हवा होता, पण यावेळीही तिला मुलगीच झाली. बाळाला दूध पाजत असताना शिवानीने आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका पिशवीत टाकून छतावर फेकून दिला. पण घरच्यांना काय सांगायचे, हे समजत नसल्याने तिने बाळ कोणीतरी उचलून नेल्याचा बनाव रचला. याप्रकरणी शिवानीला अटक करण्यात आली. चिमुकलीचा मृत्यू नेमके कशामुळे झाला? याची माहिती मिळवण्यासाठी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.