मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ज्ञानवापी प्रकरण : शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, प्राध्यापकाला अटक

ज्ञानवापी प्रकरण : शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, प्राध्यापकाला अटक

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 09:02 AM IST

एके ४७ चा परवाना मिळावा अशी मागणी करत त्यांनी आपण आक्षेपार्ह पोस्ट हटवणार नाही असंही सांगितलं होतं.

ज्ञानवापी मशिद, वाराणसी
ज्ञानवापी मशिद, वाराणसी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक रतन लाल यांना ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी प्राध्यापक रतन लाल यांना आज न्यायालयात हजार करण्याची शक्यता आहे. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतन लाल यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनित जिंदल यांनी तक्रार दाखल केली होती. डॉक्टर रतनलाल यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून तक्रार दाखल करण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी प्राध्यापक रतन लाल यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, हिंदू कॉलेजमध्ये शिकवणारे सहाय्यक प्राध्यापक रतन लाल यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिद परिसरात शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी त्यांना शुक्रवारी रात्री अटक कऱण्यात आली.

पोलिसांनी रतन लाल यांना भारतीय दंड विधान कलम १५३ ए आणि कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ही अटकेची कारवाई केली आहे. वकील विनीत जिंदल यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं की, रतन लाल यांनी शिवलिंगाबाबत एक आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर अशी पोस्ट केली होती. यानंतर त्यांनी धमक्या येत असल्याचं सांगत एके ४७ रायफलचा परवाना मिळावा अशी मागणीsura करणारं पत्र पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं. तसंच त्यांनी आपली फेसबुक पोस्ट हटवणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी केली. यावेळी ट्रायल कोर्टात सुनावणी सुरु राहील असे सांगितले आहे. तसंच सर्व्हे अहवाल लीक झाल्यानं नाराजी व्यक्त केली असून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच ट्रायल कोर्ट हिंदू पक्षाने दाखल केलेली याचिका योग्य आहे की नाही यावर निर्णय घेईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

IPL_Entry_Point