Delhi Fire News: उत्तर दिल्लीतील दोन मजली घराचे छत कोसळल्यानंतर गॅसची पाइपलाइन फुटून आग लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जण होरपळल्याची घटना घडली. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेला येथील शनिबाजार भागात सकाळी सातच्या सुमारास जेवण बनवत असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
नरेला येथील शनिबाजार भागात आग आणि इमारत कोसळल्याची माहिती आम्हाला सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. डीडीए जनता फ्लॅटचे छत अचानक कोसळले, ज्यामुळे पीएनजी गॅस पाईपलाईन तुटली आणि आग लागली. ही आग झपाट्याने संपूर्ण घरात पसरली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली.
सुरुवातीला एनआयए पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. या घटनेची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला देण्यात आली आणि पथके घटनास्थळी दाखल झाली. सिलिंडर फुटल्याने इमारत कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. मात्र, याप्रकरणी तपासणी केल्यानंतर घरात स्फोट झाला नसल्याची खात्री पटली. जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजू (वय, ४०), त्याची पत्नी राजेश्वरी (वय, ३५), मुलगा राहुल (वय, १८) आणि तीन मुली मोहिन (वय, १२), वर्षा (वय, ५) आणि माही (वय, ३) अशी या आगीत होरपळलेल्या लोकांची नावे आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू ५२ टक्के, त्याची पत्नी ४५ टक्के आणि मुलगा ४५ टक्के भाजला आहे. मोहिनी, वर्षा आणि माही या दाम्पत्याच्या मुली अनुक्रमे ५० टक्के, ६ टक्के आणि ८ टक्के भाजल्या आहेत.
दिल्लीतील गीता कॉलनी परिसरातील राणी गार्डनमधील अनेक झोपडपट्ट्यांना गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) रात्री अडीचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच टायर आणि भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि तासाभरात आग आटोक्यात आणली. ही आग नेमके कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करीत आहे.
संबंधित बातम्या