मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाने बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाने बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 09, 2022 11:41 AM IST

लेखकाने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यासोबत १० वर्षे दुष्कृत्य केल्याचा आरोप युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीने केला आहे.

लेखल निलोत्पल मृणाल
लेखल निलोत्पल मृणाल (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीने साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकावर गंभीर आरोप केले आहेत. निलोत्पल मृणाल असं लेखकाचं नाव असून तरुणीने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जवळपास दहा वर्षे लेखकाने आपल्यावर अत्याचार केल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिमारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यात लेखक निलोत्पल मृणाल याने लग्नाचं आमिष दाखवून १० वर्षे दुष्कृत्य केल्याचं म्हटलं आहे. तसंच एका पोलिसाने तरुणीच्या वडिलांना फोन करून ती लेखकाकडून पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचं सांगितलं असं एफआयआरमध्ये तरुणीने म्हटलं आहे.

पीडीत तरुणी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये राहणारी आहे. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत घर भाड्याने घेऊन ती राहत आहे. मुखर्जी नगर इथं ती युपीएससीची तयारी करत असल्याचंही तिने सांगितलं. जवळपास दहा वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या मूळचा झारखंडचा असलेल्या निलोत्पल याच्याशी तिची फेसबुकवर ओळख झाली होती.

प्रत्यक्षात भेटी गाठी वाढत गेल्यानंतर २०१३ मध्ये निलोत्पलने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचं पीडित तरुणीने म्हटलं आहे. तसंच आरोपीने पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लग्नाचं आमिष दाखवलं, मात्र लग्नाची विचारणा करताच कारणं देत असल्याचं तरुणीने म्हटलं आहे.

पीडित तरुणीने आरोप केला आहे की, निलोत्पलच्या स्वभावाबाबत शंका आल्यानंतर त्याचा फोन चेक केला. तेव्हा त्याचे इतर अनेक मुलींसोबत संबंध असल्याचं समजलं. यानंतर तिमारपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

WhatsApp channel