मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Crime News: पाच हजार कार चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड; तब्बल १८१ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक

Delhi Crime News: पाच हजार कार चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड; तब्बल १८१ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 06, 2022 02:06 PM IST

Delhi Crime News : आरोपीनं १९९८ पासून कार चोरी करायला सुरुवात केली होती. त्यानं आतापर्यंत देशातील अनेक भागांमधून तब्बल पाच हजार कार चोरलेल्या आहेत.

Delhi Crime News In Marathi
Delhi Crime News In Marathi (HT)

Delhi Crime News In Marathi : १९९८ पासून आतापर्यंत देशातील अनेक भागांमधून जवळपास पाच हजार कार चोरणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला दिल्ली पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर आतापर्यंत देशातील विविध भागांमध्ये तब्बल १८१ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय तो पूर्वोत्तर राज्यांमध्ये कुख्यात गुन्हेगार असल्यानं त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचं हे मोठं यश मानलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना देशातील पाच हजार कार चोरणारा कुख्यात आरोपी अनिल चौहान (५२) हा दिल्ली शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी याआधी आसाम सरकारमध्ये सरकारी कंत्राटदार होता. परंतु त्याच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्यानंतर त्यानं देशभरात कार चोरण्याची टोळी तयार केली. याशिवाय देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्यानं गेंड्याचे शिंग चोरीच्या घटनांमध्येही तो कुख्यात होता. त्याचबरोबर हत्यारांच्या विक्रीबाबत त्याला अनेक दिवसांपासून आसाम पोलीस शोधत होते. परंतु आता आरोपीच्या नाड्या दिल्ली पोलिसांनी आवळल्यानंतर त्याच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झाल्या आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून दिल्लीत अवैध हत्यारांची विक्री होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांना देशभरात १८१ गुन्हे दाखल असलेला आरोपी अनिल चौहान दिल्लीतील डीबीजी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चौहानला एक देशी पिस्तूल, काडतुसे आणि चोरलेल्या दुचाकीसह अटक केली. याशिवाय त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आणखी काही हत्यारं जप्त करण्यात आली आहे.

आसाम आणि दिल्लीतील गुन्हेगारीतलं मोठं नाव...

आरोपी अनिल चौहान यानं १९९८ नंतर देशातील विविध भागांमधून आतापर्यंत पाच हजार वाहनं चोरलेली आहेत. त्याला अनेकदा अटक होऊन तुरुंगवासही झालेला आहे. २०१५ साली त्याला एका आमदारासह अटक करण्यात आली होती. त्यामुळं आता अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये संलिप्त असणाऱ्या अनिल चौहानला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग