Rahul Gandhi Police Investigation : भारत जोडो यात्रेदरम्यान बलात्कार पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचलं आहे. दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल दोन तास राहुल गांधी यांची चौकशी केली असून त्याचा तपशीलही माध्यमांसमोर जारी केला आहे. आम्ही राहुल गांधी यांना बलात्कार पीडितांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माहिती मागितली असून त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक लोकांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना देशातील बलात्कार पीडितांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून आवश्यकता भासल्यास राहुल गांधींची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची चौकशी केल्यामुळं यावरून काँग्रेस आणि भाजपात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत जोडो यात्रा ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये पोहचली होती. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, अनेक महिलांनी माझी भेट घेतली आहे. त्यातील काही महिलांवर बलात्कार करण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या खूप दुखी असल्यानं मी त्यांना या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊ का?, असं विचारलं होतं. परंतु त्यांना ही बाब केवळ मलाच सांगायची होती. कारण याबाबतची माहिती पोलिसांना कळाली तर त्यांना अधिक नुकसान सहन करावं लागू शकतं, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.