साउथ वेस्ट दिल्लीतील रंगपुरी परिसरात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील एका घरातून वडिलांसह त्यांच्या ४ दिव्यांग मुलींचा मृतदेह आढळला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव हीरालाल असून तो सुतारकाम करत होता. एक वर्षापूर्वी त्याची पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील वसंतकुंजमधील रंगपुरी परिसरात सामूहिक आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि त्याच्या चार दिव्यांग मुलींचा समावेश आहे. दरम्यान, एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो व्यक्ती निळ्या रंगाची पॉलिथीन घेऊन घरात जाताना दिसत आहे. पॉलीथिनमध्ये मिठाईचा डबा होता आणि त्या व्यक्तीने मिठाईत विष मिसळून मुलींना खाऊ घातले असावे, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हे सीसीटीव्ही फुटेज २४ सप्टेंबर रोजीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, घरातून मिठाईचा बॉक्स जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वडील हिरालाल आणि त्यांच्या चार मुली नीतू (१८), निशी (१५), नीरू (१०) आणि निधी (८) अशी मृतांची नावे आहेत. त्याच्या घरातून सल्फेजच्या गोळ्याही सापडल्या आहेत, ज्या अँटी बॅक्टेरियल इन्फेक्शन बरा करण्यासाठी वापरल्या जातात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ते आपल्या मुलींसोबत एकटेच राहत होते. चारही मुली अपंग होत्या. वडील सुतारकाम करायचे आणि संध्याकाळी घरी आल्यावर मुलींचा सांभाळ करायचे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुली क्वचितच त्यांच्या खोलीतून बाहेर पडत असत. शेजाऱ्यांनी दावा केला की त्यांनी २४ सप्टेंबर रोजी या व्यक्तीला आणि त्याच्या मुलींना शेवटचे पाहिले होते.
रंगपुरी परिसरातील एका फ्लॅटच्या पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. डीसीपी मीना यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता एका खोलीत हीरालाल मृतावस्थेत आढळले, तर दुसऱ्या खोलीत त्याच्या चार मुलींचे मृतदेह आढळले.
शेजारी आणि जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता हिरालाल यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांना महिन्याला सुमारे २५,००० रुपये मिळायचे, पण जानेवारी २०२४ पासून ते कामावर गेले नव्हते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिरालाल यांचा भाऊ मोहन शर्मा आणि वहिनी गुडिया शर्मा त्यांच्या घरी पोहोचले. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी कौटुंबिक बाबींमध्ये रस घेणे बंद केले होते आणि ते बहुतेक आपल्या मुलींच्या उपचारात व्यस्त होते. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम १९४ अन्वये तपास सुरू करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.