Delhi Crime : राजधानी दिल्ली एका भयंकर घटनेनं हादरली आहे. देश चंद्रावर जात असतांना अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. दिल्लीतील पालम भागात एका व्यक्तिच्या खुनाच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळाला असून यात खळबळजनक माहिती पुढे आली आहे. तांत्रिक विधीसाठी एका व्यक्तीचा निर्घृण खून करून बळी दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील एटा येथून एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याचे नाव कार्तिक असे आहे. तर देवदास असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हा करण्यापूर्वी आरोपीने पालम येथे राहणाऱ्या देवदासला दारू पाजली. यानंतर त्यांच्या घरी तांत्रिक विधीसाठी त्याची हत्या करून त्याचा बळी देण्यात आला. कुर्बानीसाठी आरोपींनी अनेक दिवस अगोदर कोयता खरेदी केला होता. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, तांत्रिक विधित विशेष सिद्धी मिळवण्यासाठी त्याने या व्यक्तिचा बळी दिल्याचं कबूल केलं आहे. वकील दीपक त्यागी यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी द्वारका कोर्टातून दोन दिवसांच्या रिमांडवर ताब्यात घेतलं आहे.
डॉक्टरांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केले असता शिर हे कोयत्याने शरीरापासून वेगळे केलं आसल्याच आढळलं. तर मृताचे डोळे फोडून त्यात गहू, बार्ली आणि काळ्या मोहरीचे दाणे भरण्यात आल्याचं निष्पन्न झालं. डॉक्टरांनी मृताच्या जळालेल्या शिराची देखील तपासणी केली. आरोपीने रक्त काढण्यासाठी डोके धडापासून वेगळे केल्याच अहवालात समोर आलं आहे. त्यानंतर तेल टाकून डोकं जाळून टाकण्यात आलं. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी आरोपीची पुन्हा चौकशी केली असता त्याने देवदासची बळी देण्यासाठी हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीने सांगितले की, त्याला विशेष सिद्धी मिळवायची होती. तांत्रिक सिद्धित यश मिळवण्यासाठी बळीची गरज होती. त्यामुळे देवदासची त्याने निवड केली होती.
पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याने खुनाची कबुली देत देवदास आपला अपमान करत असल्याचे सांगितले. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने त्याची हत्या केल्याचे सुरवातीला सांगितले होते. हत्या केल्यावर आरोपी रात्रभर मृतदेहाजवळ थांबला होता, तर मृताच्या डोक्याला आग लावल्यानंतर घरात धूर पसरल्याचे तपासात समोर आले आहे. धूर पसरल्यानंतर आरोपींनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवली व मृतदेह कपड्यात गुंडाळून एका पोत्यात ठेवला. त्यानंतर तो पळून गेला.
आरोपीने सांगितले की, तो अनेकदा देवदासच्या इमारतीत मोटार चालविण्यासाठी जात होता. देवदासचे लग्न झालेले नसून तो लग्न न करता एका महिलेसोबत राहत होता. ही बाब आरोपीला माहिती होती. देवदासची मैत्रीण ही आंध्र प्रदेशला गेली होती यामुळे देवदास घरात एकटाच होता. आरोपी कार्तिक देवदासकडे वारंवार येत असे. घटनेच्या दिवशी तो त्याच्या घरी गेला तेव्हा त्याच्यावर कोणालाच संशय आला नाही. बळी देण्यापूर्वी आरोपींनी देवदासला दारू पाजली होती. यानंतर कोयत्याने त्यांचा गळा कापण्यात आला.