सतत डेडलाइन बदलत असलेल्या बहुचर्चित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेचे (Delhi-Mumbai Expressway) कामाची आता नवीन डेडलाइन आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा १३६८ किमी लांब एक्स्प्रेस-वे सुरू व्हायला आता २०२६ साल उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज, शुक्रवारी ही माहिती दिली. हा एक्स्प्रेस-वे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यानच्या काळात या महामार्गाच्या कामाच्या वेळापत्रकात अनेकवेळा बदल करण्यात आले होते.
'दिल्ली- मुंबई एक्स्प्रेस-वेचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल. या कामात काही तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी आहेत. महामार्गासाठी लागणारी जमीन ही सर्वसामान्य नागरिकांकडून संपादित करावी लागत असल्याने प्रकल्पाला थोडा विलंब होतोय.' असं मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भूसंपादन हा राज्याचा विषय असल्याने अनेक राज्य सरकारे या प्रक्रियेत सहभागी आहेत, असेही ते म्हणाले.
मार्च २०१९ मध्ये दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेची पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये सोहना (हरियाणा) ते दौसा (राजस्थान) या २४६ किलोमीटर अंतराच्या एक्स्प्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मोदी यांनी गेल्याच आठवड्यात राजस्थानातून जाणाऱ्या एक्स्प्रेस-वेच्या २८ किमी लांबीच्या मार्गाचे उदघाटन केले होते.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे प्रकल्प पुढील वर्षी म्हणजे ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी जुलै २०२४ मध्ये दिली होती. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २७ ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याचे गडकरी म्हणाले होते. दिल्ली आणि मुंबई या देशातील प्रमुख दोन शहरांना जोडणाऱ्या १३६८ किमी लांब एक्स्प्रेस वेवर १२ मार्गिका असणार आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिल्ली-वडोदरा एक्स्प्रेस-वेच्या बांधकामात काही त्रुटी राहिल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच संसदेतील प्रश्नोत्तरा दरम्यान दिली होती. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे एक्स्प्रेस वेच्या सोहना-दौसा विभागात काही ठिकाणी झालेल्या नुकसानीची आयआयटी खरगपूरचे तज्ज्ञ चौकशी करत असल्याचे गडकरी म्हणाले होते. कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नुकसानीची दुरुस्ती केली जात असून चौकशीदरम्यान त्रुटी आढळल्यास ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे गडकरी म्हणाले होते.
संबंधित बातम्या