Asaram Bapu Ads : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापू याच्या जाहिरातींचे पोस्टर दिल्ली मेट्रोत लावण्यात आल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका वकिलानं मेट्रोतील हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
मातृपितृ पूजन दिवसाच्या या जाहिराती आहेत. स्वयंघोषित अध्यात्मिक बाबा आसारामचे अनुयायी व्हॅलेंटाइन दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करतात. त्याच्या या जाहिराती आहेत. मात्र यावर एका वकिलानं तीव्र आक्षेप घेतला आहे.
'बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या आणि तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराची पोस्टर्स आणि छायाचित्र दिल्ली मेट्रो रेल्वेमध्ये लावण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? #delhimetro हे अत्यंत लज्जास्पद कृत्य आहे,' अशी पोस्ट एका वकिलानं मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर केली आहे.
वकिलानं केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) खडबडून जागं झालं आहे. डीएमआरसीनं एक ट्विट केलं असून या जाहिराती काढून टाकण्याची प्रक्रिया त्वरित सुरू केली आहे. तसे आदेश संबंधितांना दिले आहेत. मात्र जाहिराती संपूर्णपणे हटविण्यासाठी थोडा वेळ लागेल, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
वकिलानं केलेल्या पोस्टला २.२१ लाख व्ह्यूज, ५.२ लाख लाइक्स मिळाले आहेत. शिवाय त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. नेटकरी म्हणतात…
त्यांना फक्त त्यांच्या कमाईशी देणंघेणं आहे…
जाहिराती लावताना लगेच लावता, मग काढून टाकण्यासाठी तुम्हाला इतके दिवस का लागतात?…
'सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह जाहिराती लावण्याची ही दुसरी घटना आहे. स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित असंवेदनशील जाहिरातीही याआधी दिसल्या होत्या. अशा जाहिराती प्रदर्शित होण्याआधी त्यांना मान्यता देणारी यंत्रणा असावी असं मला वाटतं…
दिल्ली मेट्रोनं त्वरित दखल घेऊन कारवाई सुरू केल्याबद्दल कौतुक…
खरंतर हे धक्कादायक आहे की पहिल्यांदा त्याला परवानगी कशी देण्यात आली? डीएमआरसी पैसे कमावण्यासाठी खूप उतावीळ आहे असं यातून दिसतं.
एकेकाळी अध्यात्मिक गुरू म्हणून देशभर मिरवणाऱ्या आसाराम बापूला आश्रमातील एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
सध्या तो वैद्यकीय कारणास्तव ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर आहे. अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, आश्रमात असताना २००१ ते २००६ या कालावधीत शिष्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आले.
संबंधित बातम्या