दिल्लीतील कालकाजी मंदिरात शनिवारी (२७ जानेवारी) रात्री मोठी दुर्घटना घडली. या मंदिर परिसरात जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्या ठिकाणी कीर्तन सुरू होते, त्या भागातील लाकडी आण लोखंडी स्टेज कोसळला.
या घटनेनंतर मंदिर आणि परिसरात चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. जखमींना दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातावेळी त्या ठिकाणी जवळपास १५००-१६०० लोकांचा जमाव होता. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे, काहींना फ्रॅक्चर झाले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गायक बी प्राकदेखील या जागरणादरम्यान तेथे उपस्थित होता, त्याच्या भजनानाचा कार्यक्रम तेथे होणार होता, असे सांगण्यात येत आहे. पण त्याआधीच अचानक स्टेज कोसळला आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात १७ जण जखमी झाले.
घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, स्टेज लाकडी फळ्या आणि लोखंडी खांबांनी बनवलेला होता. पण स्टेजवर मोठ्या संख्येने लोक चढले आणि स्टेजवरील भार वाढला, त्यामुळे तो कोसळला. तसेच, येथे गेल्या २६ वर्षांपासून जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, असेही पोलिसांनी सांगितले.