Delhi Temperature News : ‘उष्णता सध्या भयंकर वाढलीय, दहा मिनिटं बाहेर पडलं तरी असह्य होतं. नळाचं पाणी उकळल्यासारखं वाटतं आणि उकाडा संपतच नाहीए. दिल्लीत राहणं कठीण झालंय…’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर फिरत असलेली ही पोस्ट दिल्लीतील एका उद्योजकाची आहे. पुनीत सिंगल असं या उद्योजकाचं नाव आहे. दिल्लीतील तापमानाच्या भयाण परिस्थितीचं वर्णन सिंगल यांनी केलं आहे. मात्र, हा अनुभव केवळ सिंगल यांचा नाही. असे हजारो ट्वीट्स 'एक्स'वर आहेत.
देशाच्या काही भागांत मोसमी पावसानं हजेरी लावली असली तरी उत्तर भारत उष्णतेच्या तडाख्यात सापडला आहे. उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आहे. राजधानी दिल्लीची अवस्था खूपच बिकट आहे. उष्णतेनं या आठवड्यात नवी दिल्लीत किमान पाच जणांचा बळी घेतला आहे.
मार्च महिन्यापासून दिल्ली आणि वाळवंटी प्रदेश असलेल्या राजस्थानमध्ये तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एकीकडं तापमानानं उच्चांक गाठला असताना दिल्लीत पाण्याची कमतरता आणि विजेचा लपंडावही सुरू आहे. मंगळवारी दिल्लीतील वीज वापर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. वाढत्या मागणीचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे.
'दिल्ली राहण्यायोग्य नाही' हा मेसेज सोशल मीडियावर चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीतील कडक उन्हाळ्याला हिवाळ्यातील थंड तापमान, सतत प्रदूषण आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात येणाऱ्या अडचणी ही कारणं असल्याचं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.
काल, १८ जून २०२४ च्या रात्री दिल्लीचं किमान तापमान ३५.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हे प्रमाण सर्वसाधारण तापमानापेक्षा आठ अंशांनी अधिक आहे. १३ वर्षांनंतर जून महिन्यात दिल्लीत एवढ्या उच्च किमान तापमानाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०११ मध्ये किमान तापमान ३५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. दिवसा उष्णतेच्या लाटेचा कहर आणि रात्री उष्णतेमुळं दिल्लीचं वातावरण असह्य झालं आहे.
पत्रकार ऋतुपर्णा चॅटर्जी यांच्यासह अनेस सोशल मीडिया युजर्सनी दिल्लीतील उष्णतेच्या लाटेबद्दल भाष्य केलं आहे. एनसीआरमध्ये नेमकं काय घडतंय आणि इथं किती उष्णता आहे, हे इतर ठिकाणच्या लोकांना पूर्णपणं समजलं आहे, असं मला वाटत नाही. सकाळी ७ वाजता नळाचं पाणी उकळलेलं असतं. उन्हामुळे डोळ्याला त्रास होतो. दिवस आणि रात्रीमध्ये फरकच राहिलेला नाही. २४ तास तापमान ४० सेल्सिअसच्यावर जाणवतं. रात्रीच्या वेळीही पाणी तितकंच गरम असतं,' असं त्यांनी एक्सवर लिहिलं आहे.
नळातून उकळतं पाणी येत असल्याची तक्रार दिल्लीतील अनेक रहिवाशांनी केली आहे.
एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, दिल्लीत नळांच्या पाण्याचं तापमान ७५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. एक दिवस असा येईल की इथं स्टोव्हशिवाय मॅगी शिजवता येईल.'
आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात भयंकर उन्हाळा असं काहींनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या