Patanjali vs Dabur Chyawanprash: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश देत मोठा धक्का दिला आहे. पतंजलीने डाबर च्यवनप्राशविरोधात कोणतीही दिशाभूल करणारी किंवा नकारात्मक जाहिरात प्रसारित करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. डाबरने पतंजलीवर आपल्या जाहिरातींद्वारे डाबर च्यवनप्राशची चुकीची माहिती दिली आणि ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी पतंजली आयुर्वेदविरोधात सुरू असलेल्या वादात डाबर इंडियाला महत्त्वपूर्ण अंतरिम दिलासा दिला. अंतरिम दिलासा देण्याची डाबर यांची याचिका न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
डाबरच्या च्यवनप्राश उत्पादनाला लक्ष्य करणाऱ्या पतंजलीच्या टीव्ही जाहिरातींवर आक्षेप घेत डाबर इंडियाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतंजलीने डाबरचे उत्पादन सामान्य असल्याचे सांगून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डाबरने केला आहे. पतंजलीच्या जाहिरातीत दावा करण्यात आला होता की, त्याचा च्यवनप्राश ५१ हून अधिक औषधी वनस्पतींपासून बनलेला आहे, तर प्रत्यक्षात त्यात केवळ ४७ औषधी वनस्पती आहेत. पतंजलीच्या उत्पादनांमध्ये पारा (Mercury) असल्याचे आढळून आले असून, ते मुलांसाठी हानिकारक आहे, असा आरोपही डाबरने केला आहे.
डाबर काय म्हणाले?
डाबरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संदीप सेठी म्हणाले की, पतंजलीने हा एकमेव अस्सल आयुर्वेदिक च्यवनप्राश असल्याचा भ्रामक आणि खोटा दावा करून असा आभास देण्याचा प्रयत्न केला, तर डाबरसारखा जुना ब्रँड सामान्य असल्याचे म्हटले जात होते. डिसेंबर २०२४ मध्ये न्यायालयाने समन्स बजावूनही पतंजलीने एकाच आठवड्यात ६,१८२ दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या, याकडेही सेठी यांनी लक्ष वेधले.
पतंजलीचा युक्तिवाद
पतंजलीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, त्यांच्या उत्पादनातील सर्व औषधी वनस्पती आयुर्वेदिक मानकांशी सुसंगत आहेत. हे उत्पादन मानवी वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणतेही हानिकारक घटक आढळले नाहीत.
डाबरने असेही म्हटले आहे की च्यवनप्राशचा ६१.६% बाजार हिस्सा आहे आणि पतंजलीने अशी जाहिरात करणे ही एक स्पर्धात्मक युक्ती आहे जी ब्रँडच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते.
संबंधित बातम्या