दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसांनंतर तिहार जेलच्या बाहेर आले आहेत. शुक्रवारी सांयकाळी केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. बाहेर येताच 'माझी ताकद १०० पटीने वाढली, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.
केजरीवाल यांनी ईडीने २१ मार्च २०२४ रोजी अटक केल्यानंतर १० दिवसांच्या चौकशीनंतर १ एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवले होते. यानंतर १० मे रोजी त्यांना २१ दिवसांसाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीनावर सोडले गेले. निवडणूक संपताच केजरीवाल यांनी पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होते. ही २१ दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण १५६ दिवस कारागृहात राहिले आहेत. मात्र अटक केल्यानंतर त्यांना जवळपास १७७ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर तुरुंगातून बाहेर आले आहेत. मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी 'आप'च्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझी ताकद १०० पटीने वाढली आहे. माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी बलिदान देणारा आहे. मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. मला आयुष्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण देवाने मला प्रत्येक पावलावर साथ दिली आहे. देवाने मला साथ दिली कारण मी सच्चा होतो. बरोबर होतो. ज्यांनी मला तुरुंगात टाकलं त्यांना वाटलं की आमचं ब्रेकअप होईल.
आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. माझा उत्साह १०० पटीने वाढला आहे. माझी ताकद शंभर पटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या जाड भिंती केजरीवाल यांचे मनोबल कमकुवत करू शकत नाहीत. देवाने मला आजपर्यंत जसा मार्ग दाखवला आहे, तसाच भविष्यातही तो मार्ग दाखवत राहो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
'मी देशाची सेवा करत आहे. देशाच्या विकासात अडथळा आणणाऱ्या, देशाचे विभाजन करण्याचे काम करणाऱ्या, देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक देशद्रोही शक्ती आहेत. मी आयुष्यभर त्यांच्याविरोधात लढलो. यापुढेही मी असाच लढा देत राहीन.
अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले तेव्हा मोठ्या संख्येने 'आप'चे नेते आणि समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. पाऊस असूनही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह 'आप'चे अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
निळ्या-पिवळ्या पक्षाचे झेंडे असलेले पोस्टर्स, बॅनर आणि छत्री घेऊन 'आप'चे समर्थक मुसळधार पावसात कारागृहाबाहेर होते. संतप्त जमावाने मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 'आप'चे वरिष्ठ नेते उपस्थित होते.आम आदमी पक्षाचे शक्तिप्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी अटक केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या ५ ऑगस्टच्या आदेशाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी केजरीवाल यांची अटक कायम ठेवली होती.