दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांपैकी सुमारे ८० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या तीन जागा वगळता सर्व जागांवरील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आले. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात आप, भाजप आणि मित्रपक्ष जनता दल (युनायटेड) आणि लोजपा (रामविलास) यांच्या सर्व उमेदवारांनी आपले डिपॉझिट वाचविण्यात यश मिळवले.
५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांपैकी ५५५ (७९.३९ टक्के) उमेदवारांचे डिपॉझिट बुडाले. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा जागांच्या बाबतीत भोपळाही फोडता आला नाही, शिवाय ६७ उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की आहे. २०१३ पर्यंत सलग तीन वेळा दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसने सर्व ७० विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते.
काँग्रेसच्या केवळ तीन उमेदवारांना डिपॉझिट वाचविण्यात यश आले. यामध्ये कस्तुरबा नगरमधून अभिषेक दत्त, नांगलोई जत मधून रोहित चौधरी आणि बादलीतून देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. दोन जागा लढविणारे एमआयएमचे शिफा-उर-रेहमान खान यांनीही ओखलामधील आपली डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील कोणत्याही उमेदवाराला १० हजार रुपये सुरक्षा म्हणून निवडणूक आयोगाकडे जमा करावे लागतात.
इतकंच नाही तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी ५,००० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. उमेदवाराची निवड झाली नाही तर. जर त्याला मिळालेल्या वैध मतांची संख्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण वैध मतांच्या सहाव्या भागापेक्षा कमी असेल तर अनामत रक्कम जप्त केली जाते.
संबंधित बातम्या