Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कल ९ नंतर येण्यास सुरुवात होईल. दुपारपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट होण्यास सुरुवात होईल.
दिल्लीतील ११ जिल्ह्यांतील १९ मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या निकालाचे रिअल टाइम अपडेट मिळण्यासाठी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसच्या मुख्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली. पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यालयात उपस्थित राहून पत्रकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
स्ट्राँग रूममध्ये आयोग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या कडक देखरेखीखाली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, मायक्रो ट्रेनर, डेटा ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत.
ईव्हीएम ठेवण्यासाठी एकूण ७० स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्हीबरोबरच पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षकांच्या देखरेखीखालीमतमोजणीही होणार आहे. स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर आणण्यापासून मतमोजणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पर्यवेक्षक, सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सांख्यिकी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशिनच्या स्लिपची मोजणी यादृच्छिक पद्धतीने केली जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या विसंगतीचे मूल्यमापन करणे किंवा जुळविणे सोपे होईल.
या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एजंट आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. ते सीसीटीव्ही फीडद्वारे 24 तास सुरक्षा पाळत ठेवू शकतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी स्ट्राँग रूमच्या अंतर्गत सुरक्षा घेरामध्ये प्रवेश करण्याची आणि सुरक्षा उपाययोजनांवर देखरेख ठेवण्याची परवानगी दिली जात आहे.
नवी दिल्ली आणि ईशान्य जिल्ह्यात प्रत्येकी तीन, चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन आणि पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. उद्या सकाळी सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. दुपारपर्यंत निवडणूक निकालाची स्थिती स्पष्ट होईल.
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत झालेल्या मतदानानुसार राजधानीतील ११ जिल्ह्यांमध्ये ६०.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हानिहाय मतदानाच्या टक्केवारीत ईशान्य दिल्ली आघाडीवर असून सर्वात कमी मतदान दक्षिण-पूर्व दिल्लीत झाले आहे.
मध्य दिल्ली (५९.०९ टक्के), पूर्व दिल्ली (६२.३७ टक्के), नवी दिल्ली (५७.१३ टक्के), उत्तर दिल्ली (५९.५५ टक्के), ईशान्य दिल्ली (६६.२५ टक्के), उत्तर पश्चिम दिल्ली (६०.७ टक्के), शाहदरा (६३.९४ टक्के), दक्षिण दिल्ली (५८.१६ टक्के), दक्षिण पूर्व दिल्ली (५६.१६ टक्के) आणि दक्षिण पश्चिम दिल्ली (६१.०७ टक्के) येथे मतदान झाले.
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० मतदारसंघांतील फॉर्म १७ सी सह निवडणूक कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननीदरम्यान निवडणूक आयोगाचे केंद्रीय उमेदवार आणि त्यांचे एजंट आणि निवडणूक अधिकारी उपस्थित होते. एकाही उमेदवाराने तक्रार दाखल केलेली नाही.
एकीकडे दिल्लीतील सत्ताधारी 'आप' चौथ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे भाजप २५ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. २०२० च्या निवडणुकीत 'आप'ने एकूण ७० जागांपैकी ६२ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३.५७ टक्के, भाजपला ३८.५१ टक्के आणि काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. एकूण ६९९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
संबंधित बातम्या