केवळ १६ वर्षाची अल्पवयीन मुलगीदिल्लीतून १८ जुलै २०२४ पासून बेपत्ता झाली होती.दिल्ली पोलिसांनी तिच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी बातमी आली की, मुलीचा मृतदेह यूपीमधील संभल जिल्ह्यातील एका शेतात आढळला आहे. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते व तिचा चेहरा दिल्लीतील बेपत्ती मुलीशी मिळताजुळता होता. माहिती मिळताच दिल्ली पोलिस दलातील चार पोलीस निरीक्षक व एक उपनिरीक्षक बेपत्ती मुलीच्या आई-वडिलांना घेऊन संभलकडे रवाना होतात. तेथे गेल्यावर आई-वडिलांना मृतदेहाची ओळख पटते व ते सांगतात की, हा मृतदेह त्यांच्या मुलीचाच आहे.
मात्र दिल्ली पोलिसांना यात काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. त्यांना खात्री पटते की, हा मृतदेह त्या मुलीचा नाही, जिच्या शोधासाठी त्यांनी एक महिन्यापासून दिल्लीतील काना कोपरा धुंडाळला होता. दिल्ली पोलिस मुलीच्या आईवडिलांना न सांगता तिची शोधमोहिम सुरू ठेवतात. सीसीटीवी कॅमेऱ्यांच्या मदतीने पुरावे गोळा केले जातात. अखेर दिल्ली पोलिसांचे एक पथक राजधानीपासून जवळपास २०० किलोमीटर दूर हरियाणा राज्यातील पंचकुला येथे १२ ऑगस्ट रोजी पोहोचतात.ज्या मुलीला गेल्या एक महिन्यापासून पोलीस दिल्लीत शोधत होते, जिचा मृतदेह उत्तरप्रदेशमधील संभल येथे आढळला होती, ती मुलगीपंचकुला येथे आपल्या प्रियकरासोबत लिवइन मध्ये रहात होती.
ही मुलगी १९ वर्षाच्या आपल्या प्रियकरासोबत गेल्या एक महिन्यापासून रहात होती. दोघांनी भाड्याने खोली घेऊन लपून रहात होते. तिच्या प्रियकर येथे पार्किंग कर्मचारी म्हणून काम करत होता. आता प्रश्न होता की, जर दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी पंचकुला येथे रहात होती तर उत्तरप्रदेशमध्ये आढळलेला मृतदेह कोणाचा होता? त्याहून मोठा प्रश्न होता की, जर आई-वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली होती तर पोलिसांना कसा संशय आला की, मुलगी जिवंत आहे?
या प्रकरणात मुलीच्या नाकातील नथ पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरला. १८ जुलै रोजी जेव्हा मुलीच्या आई-वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तेव्हा त्यांनी तिची ओळख सांगताना म्हटले होते की, त्यांची मुलगी नाकाच्या डाव्या बाजुला नथ घालत होती. तर संबलमध्ये जो मृतदेह मिळाला होता, त्या मुलीने उजव्या बाजुला नथ घातली होती. त्याचबरोबर तपासात असा कोणताच पुरावा मिळाला नाही की, मुलगी उत्तरप्रदेशकडे गेली होती.यामुळे पोलिसांना संशय आला व त्यांना तपास सुरूच ठेवला. त्यानंतर सीसीटीवी कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत माग काढत पोलीस पंचकुला येथे पोहोचले.
चौकशीत मुलीने सांगितले की, ज्या मुलावर तिचे प्रेम आहे, तो दुसऱ्या धर्मातील असल्याने त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. दोघे ११ वीत शिकत होते. कुटूंबीयांना विरोध केल्यानंतर दोघे घरातून पळून गेले होते. दोघे हरियाणामधील पंचकुला येथे भाड्याच्या खोलीत रहात होते. पोलिसांनी सांगितले की, मुलीला कुटूंबीयांकडे सोपवून मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवलआहे. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये आढललेल्या मुलीच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती मिळाली नाही.