दिल्ली : दिल्लीच्या उत्तर भागातील शाहबाद डेअरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्यावर होणाऱ्या अत्याच्याराला त्याने विरोध केल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. तसेच या बाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तब्बल आठवडाभर त्याच्यावर अत्याचार केले. यानंतर देखील ही मुले त्यांना त्रास देत होती. हा त्रास सहन न झाल्याने पीडित मुलाने ही बाब घरी सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगा हा आपल्या कुटुंबासोबत रोहिणी परिसरात राहतो. याच परिसरातील एका सरकारी शाळेत इयत्ता आठवीत तो शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात त्याच्या शाळेत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालत होते. पीडित मुलगा देखील या शिबिरात जात होता. दरम्यान त्यांच्या वर्गातील विद्यार्थी देखील या उन्हाळी शिबिरासाठी येत असत.
या शिबिरात असतांना पाच विद्यार्थी हे त्याच्याकडे आले. त्याला त्यांनी चुकीची कामे दिली. ही कामे करण्यास त्याने नकार दिला. यावेळी पाच विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण करत शाळेच्या उद्यानात नेले. या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी अत्याचार केले. उद्यानात कोणीही नसल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. यानंतर पीडित मुलाला धमकावून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी देखील आरोपींनी मुलावर अत्याचार केले. हा प्रकार सलग सात दिवस सुरू होता. जीवे मारण्याच्या भीतीमुळे विद्यार्थ्याने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. मात्र, आरोपींनी त्रास सुरूच ठेवला.
पीडित मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याने या घटनेची माहिती शाळेतील महिला आणि पुरुष शिक्षकांना दिली होती. यावर शिक्षकांनी त्याला विचारले की, त्याने कुटुंबीयांना ही घटना सांगितली आहे का? विद्यार्थ्याने नकार दिला. दरम्यान, ही बाब घरी सांगू नको असे शिक्षकांनी पीडित मुलाला सांगितले. मात्र, यानंतर देखील मुलाला त्रास देणे आरोपींनी सुरच ठेवले. यामुळे अखेर पीडित मुलाने हा प्रकार घरी सांगितला. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली.
संबंधित बातम्या