मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित, VIDEO व्हायरल

रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित, VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2024 05:45 PM IST

नमाज पठण करणाऱ्या व्यक्तींना लाथा मारताना दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याची दखल दिल्ली पोलीस प्रशासनाने घेतली आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केले असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित
रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

दिल्लीतील इंद्रलोक परिसरातून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथील रस्त्यावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण केले जात होते. दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केले. पोलीस कर्मचारी नमाज पठण करणाऱ्या तरुणांना लाथा मारत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या या वर्तनाने घटनास्थली उपस्थित लोक भडकले व गोंधळ सुरु झाला. काही लोक घटनेचा व्हिडिओ बनवू लागले. तेथील लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेराव घातला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणी डीसीपी नॉर्थ मनोज मीणा यांनी म्हटले की, या घटनेची चौकशी केली जात असून योग्य ती कारवाई केली जाईल. प्रकरणाचे गांभीर्य पाहून याची सखोल चौकशी केली जात आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. लोकांना आवाहन आहे की, शांतता राखा. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आणखी कडक कारवाई केली जाईल. 

काँग्रेस खासदार इम्रान  प्रतापगढी यांनी हा व्हिडिओ X वर शेअर करत  दिल्ली पोलिसांच्या  कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रतापगढी यांनी लिहिले आहे की, नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारणारा दिल्ली पोलीस जवान कदाचीत माणुसकीचे नातेच समजत नसावा. असा कोणता द्वेष या दिल्ली पोलिसाच्या मनात आहे. दिल्ली पोलिसांना विनंती आहे की, या कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाई करत याला सेवेतून बडतर्फ करावे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “अमित शहांच्या पोलिसांचे ब्रीद वाक्य म्हणजे शांतता, सेवा, न्याय व परिश्रमपूर्वक काम..”

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्याकडेला काही तरुण नमाज पठण करत आहेत. पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस कर्मचारी नमाज पठण करणाऱ्या तरुणांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. दरम्यान पोलिसाने लाथ मारतानात जमाव एकत्र आला व त्यांनी पोलिसाला घेरले.

IPL_Entry_Point

विभाग