CM Arvind Kejriwal will be arrests by ed : कथित दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तीन समन्स पाठवून देखील मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल हे चौकशीसाठी गैर हजर राहिल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडी केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा खुद्द आम आदमी पक्षानेच केला आहे. मध्यरात्री आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. सकाळपासूनच दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांना ३ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र गेल्या दोन वेळांप्रमाणे यावेळीही त्यांनी ईडीची नोटीस बेकायदेशीर ठरवली. केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी केंद्र सरकार त्यांना अटक करू इच्छित असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. त्याचवेळी केजरीवाल यांना तपासाची भीती वाटते आणि त्यामुळे ते ईडीसमोर हजर होत नसल्याचे भारतीय जनता पक्षाने आरोप केला आहे. दुसरीकडे, भारतीय आघाडीतील आम आदमी पक्षाचा मित्रपक्ष काँग्रेसनेही केजरीवाल यांना कायद्याला सामोरे जावे, असा सल्ला दिला आहे.
ईडीने मुख्यमंत्री केजरिवाल यांना वारंवार समन्स बजावूनही दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडीने त्यांना बुधवारी तिसऱ्यांदा नोटिस पाठवली होती. मात्र, ही नोटिस बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हणत ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडी त्यांना पुन्हा समन्स पाठवण्याचा विचार करत आहेत. तपास यंत्रणा येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्याची शक्यता आहे.
केजरिवाल यांनी ईडीला पत्र लिहीत उपस्थित राहू शकत नाही असे म्हटले आहे. ईडीने २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी पाठवलेले समन्स हे त्रास देण्याच्या हेतूने पाठवले होते. तपासात यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देखील दिले जाईल. मात्र, सध्या ते राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही, असे त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मला प्रचार करता येऊ नये म्हणून जाणीव पूर्वक त्रास दिला जात असल्याचेही केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.
संबंधित बातम्या