Delhi Farmer protest : आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर रोखण्यात आले आहे. बुधवारी शेतकरी आणि पोलिस यांच्यात हिंसक आंदोलन झाले. दरम्यान, यानंतर दोन दिवस हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे प्रमुख शेतकरी नेते सर्वन सिंह पंधेर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. खनौरी येथे घडलेल्या घटनेवर चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा दिल्ली मोर्चा हा दोन दिसव स्थगित केला जाणार आहे. सरवन म्हणाले की, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच स्पष्ट करू.
केंद्रासोबत चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याने शेतकऱ्यांकडून ही घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, शेतकरी देशभरात आहेत. कोणतेही धोरण बनवताना संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन येत्या काही दिवसांत आम्ही निर्णय घेऊ.
याआधी केंद्र सरकारशी चौथ्या फेरीतील चर्चेच्या अपयशानंतर शेतकरी संघटनांनी बुधवारी पुन्हा दिल्ली चलो आंदोलन सुरू केले होते. तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेल्या सरकारी समितीने शेतकऱ्यांशी करार करून पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांसाठी किमान आधारभूत किमतीवर सरकारी संस्थांकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शेतकरी नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला.
तत्पूर्वी, भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या विविध मागण्यांसाठी रोखण्यात आले, जर ते (सरकार) शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नसतील, तर मग. शेतकरीही निवडणुकीत त्यांच्या विरोधात मतदान करतील. तसेच त्यांना गावात देखील येऊ दिले जाणार नाही. किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी (एमएसपी), उसाची थकबाकी द्यावी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बीकेयूतर्फे मेरठ येथील जिल्हा मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली.