दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून मंथन सुरू झाले आहे. दिल्लीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांमध्ये प्रवेश साहिब सिंह वर्मा, विजेंदर गुप्ता आणि सतीश उपाध्याय या नावांचा समावेश आहे. मात्र, दरम्यान, या पदासाठी एका महिला आमदारालाही संधी दिली जाऊ शकते, अशी ही बातमी समोर येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या. भाजपने दिल्लीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा नसताना निवडणूक लढवली. अशा तऱ्हेने निवडणूक जिंकल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा जोरात सुरू आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, नवनिर्वाचित ४८ आमदारांमधून दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी महिला आमदाराला संधी दिली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, दिल्लीत डेप्युटी सीएम देखील असू शकतो आणि मंत्रिमंडळात दलित आणि महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष दिले जाऊ शकते.
यावेळी दिल्लीत भाजपकडून ४ महिला आमदार झाल्या आहेत. यामध्ये रेखा गुप्ता, शिखा राय, पूनम शर्मा आणि नीलम पहलवान यांचा समावेश आहे. शालीमार बागमधून रेखा गुप्ता, ग्रेटर कैलासमधून शिखा रॉय, वजीपूरमधून पूनम शर्मा आणि नजफगढमधून नीलम पहलवान यांनी विजय मिळवला आहे.
नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट झाली होती ज्यात दिल्ली सरकारच्या स्वरूपावर चर्चा झाली होती. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल.
संबंधित बातम्या