Delhi Moolchand Hospital News: दिल्लीतील मूलचंद रुग्णालयातील एका डॉक्टरने चुकून पाच रुपयांचे नाणे गिळल्यानंतर त्याच्या घशातील नाणे काढून त्याचे प्राण वाचवले. उमाशंकर मिश्रा यांचा मुलगा शुभम मिश्रा याने काही दिवसांपूर्वी हे नाणे गिळले होते. मुलामध्ये कोणतीही लक्षणे नसली तरी एक्स-रेमध्ये त्याच्या पोटात पाच रुपयांचे नाणे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टराच्या एका पथकाने मुलाच्या पोटातील नाणे बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.
पथकाने अॅनेस्थेशिया देऊन रोथ नेट प्रक्रियेचा वापर करून मुलाच्या शरीरातील नाणे काढून टाकल्याने अनर्थ टळला. "वैद्यकीय कौशल्याचे उल्लेखनीय प्रदर्शन करत मूलचंद रुग्णालयातील डॉक्टर ऋषी रमण यांनी एका लहान मुलाच्या घशातील बंद नाणे यशस्वीरित्या काढून टाकले!" मूलचंद हेल्थकेअरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. रुग्णालयाने म्हटले आहे की, "ही केवळ वाचवलेल्या नाण्याची कहाणी नाही - ही मूलचंद च्या असामान्य गॅस्ट्रो कौशल्याचा पुरावा आहे!"
या व्हिडिओमध्ये उमाशंकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “माझ्या मुलाने तीन ते चार दिवसांपूर्वी पाच रुपयांचे नाणे गिळले. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे आम्ही डॉ. ऋषी रमण यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आमच्या मुलाच्या गळ्यातील नाणे काढून टाकले. आम्ही इतके चिंताग्रस्त झालो होतो की आम्हाला जेवण जात नव्हते. पण डॉ. रमण यांनी १५ मिनिटांतच आमच्या मुलाच्या घशातील नाणे काढून टाकले. मी डॉक्टरांचा खूप आभारी आहे.”
यावर्षी फेब्रुवारीमहिन्यात दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी ३९ नाणी आणि ३७ चुंबक गिळणाऱ्या २६ वर्षीय तरुणावर शस्त्रक्रिया केली होती. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णाला झिंक शरीरसौष्ठवात मदत करते, असे मानून नाणी व चुंबक गिळले होते. यानंतर त्याला उलट्या आणि पोटदुखीसारख्या समस्या सुरू झाल्या. मात्र हा त्रास वाढल्याने हा तरुण रुग्णालयात गेला. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या पोटात चुंबक आणि नाणी आढळली. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. याबाबत डॉक्टरांनी रुग्णांची चौकशी केली असता त्याने दिलेले कारण ऐकून संपूर्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भुवया उंचावल्या.