Delhi Vada Pav Girl : कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. दिल्लीतील चंद्रिका दीक्षित या तरुणीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. चंद्रिका ही दिल्लीत वडापाव गर्ल म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर सध्या ती प्रचंड गाजत आहे. त्याला कारणही तसंच आहे.
चंद्रिका दीक्षित हिनं नुकतीच एक आलिशान कार घेतली आहे. या कारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पांढऱ्या फोर्ड मस्टॅग कारभोवती लोकांचा गराडा पडलेला व्हिडिओत दिसतो. त्यानंतर काही वेळातच या आलिशान कारची ट्रंक उघडणाऱ्या एका माणसावर कॅमेरा स्थिरावतो आणि त्यात पाव किंवा ब्रेडचे ताट घेऊन बसलेली चंद्रिका दीक्षित दिसते. चंद्रिका कॅमेऱ्यासमोर सांगतो, थांबा! आता लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे. गर्दी टाळ्याच्या कडकडाटानं तिला प्रोत्साहन देते.
चंद्रिकानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. वडापाव गर्लनं मस्टँग कारमध्ये वडा पाव विकायला सुरुवात केली आहे, असं तिनं व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
चंद्रिकाचा हा व्हिडिओ खास यासाठी आहे की ती एक छोटी व्यावसायिक आहे. दिल्लीतील मंगोलपुरी भागात तिचा फास्ट फूडचा स्टॉल आहे. तिथं ती वडा पाव विकते. तिच्या स्टॉलला दररोज शेकडो लोक भेट देतात. ती अनेकदा Instagram वर तिनं केलेल्या नव्या खरेदीची माहिती देत असते.
दोन दिवसांपूर्वी तिनं असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती मस्टँगमधून बाहेर पडते आणि नवीन आयफोन, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स खरेदी करण्यासाठी एका दुकानात जाते.
त्याआधी चंद्रिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात मला अटक झाल्याचं ती म्हणत होती. तिच्या या व्हिडिओनंतर पोलिसांना खुलासा करावा लागला. तिला कधीही ताब्यात घेण्यात आलं नाही किंवा त्याच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही.
चंद्रिकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक इन्स्टा युजर्स चकीत झाले आहेत. साधा वडा पाव विकून अशा आलिशान गाड्या विकत घेणं परवडतं कसं? मात्र, चंद्रिकाचं सोशल मीडिया अकाऊंट चाळल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. तिच्याकडं पोर्श सारख्या उच्च श्रेणीतील कार आहेत. या कार चालवताना किंवा त्यांच्यासोबत पोज देतानाचे व्हिडिओ इन्स्टावर आहेत. यावरून तिच्याकडं अशा अनेक कार असल्याचं दिसून येतं.
संबंधित बातम्या