Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज बुधवारी मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांचे भवितव्य १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. सर्व ७० विधानसभा मतदारसंघातील १३ हजार ७६६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, दिल्ली पोलिसांचे ३५ हजार ६२६ जवान आणि १९ हजार होमगार्डतैनात केले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सीमेवरील चौक्यांवर कडक तपासणी मोहीम राबविली जात आहे. दिल्लीत येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा दल चोख बंदोबस्त ठेवून आहेत. मतदान केंद्रांवर देखील विविध स्तरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळपासून मतदान केंद्रांवर सुरक्षा रक्षकांनी बंदोबस्त ठेवला आहे.
संपूर्ण राजधानीत सुमारे ८० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ४५ हजार मतदान केंद्रांवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही नजर ठेवली जात आहे. राजधानीतील १३ हजार ७६६ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे ४५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. यात २२० कंपन्यांच्या सशस्त्र दलाच्या जवानांचा समावेश आहे. एकूण २२० कंपन्यांपैकी १५० कंपन्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान आहेत, तर उर्वरित ७० कंपन्यांमध्ये इतर राज्यांतील सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्राभोवती क्विक रिअॅक्शन टीम देखील तैनात करण्यात आली आहे.
राजधानीतील एकूण १३ हजार ७६६ मतदान केंद्रांपैकी ३१९३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. सुरक्षेसाठी येथे ४२ ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन सर्व्हेलन्स टीम या बूथवर लक्ष ठेवणार असून निमलष्करी दलाचे जवान येथे तैनात करण्यात आले आहेत.
काही ठिकाणी एसीपी दर्जाचे अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी अशा केंद्रांच्या सुरक्षेची कमान निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली आहे. बहुस्तरीय सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी मतदान केंद्रांवर सुमारे ५२ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) ही तैनात करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि अपंगव्यक्तींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन एकूण ७३३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ७ हजार ५५३ पात्र मतदारांपैकी ६ हजार ९८० मतदारांनी 'व्होटिंग फ्रॉम होम' या सुविधेअंतर्गत मतदानाचा हक्क बजावला आहे.
संबंधित बातम्या