अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शुल्क आकारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर चीनी कंपनी डीपसीकने नवे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल सादर केले आहे. यामुळे व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तांत्रिक युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. डीपसीक हे एक चिनी एआय स्टार्टअप कंपनी आहे आहे, ज्याची स्थापना २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झाली. २० जानेवारीला त्याचे ओपन सोर्स आर १ मॉडेल लाँच झाल्यानंतर ते जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
डीपसीक ॲपल स्टोअर डाउनलोडमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे आणि काही अमेरिकन टेक शेअर्स घसरले आहेत. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेबरोबरच्या या एआय टेक युद्धात गुप्त चिनी शस्त्र म्हणून डीपसीक आर १ व व्ही ३ चा प्रचार केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन आयटी कंपन्यांना सतर्क होण्याचे आवाहन केले आहे. हे तंत्रज्ञान युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी आता स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी एक प्रकारे इशाराही दिला आहे. दरम्यान, डीपसीकवर सोमवारी मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झाला, ज्यामुळे वापरकर्त्यांना साइटवर नोंदणी करणे कठीण झाले. कंपनीने ही माहिती दिली आहे.
एआय 'चॅटबॉट'ने तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या डीपसेक या कंपनीने म्हटले आहे की, आपल्या सेवेवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले आहेत. डीपसीक म्हणाले की, नोंदणीकृत वापरकर्ते नेहमीप्रमाणे लॉग इन करू शकतात. कंपनीचे हे मॉडेल 'चॅटजीपीटी' निर्माता ओपनएआयसारख्या अमेरिकन कंपन्यांच्या मॉडेल्सशी स्पर्धा करते आणि त्यांच्यापेक्षा अधिक परवडणारे असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ॲपल आणि गुगल ॲप स्टोअरवर चॅटबॉट उपलब्ध झाल्याने चॅटबॉटची व्याप्ती आणखी वाढली आहे. डीपसीक कंपनीचे डीपसीक आर १ व डीपसीक व्ही ३"एआय असिस्टंट" आयफोन स्टोअरवर सर्वात जास्त डाऊनलोड केलेले विनामूल्य ॲप्लिकेशन बनले आहे. अत्यंत कमी खर्चात एआय चॅटबॉट्स तयार करून डीपसीकने वॉल स्ट्रीट आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. यामुळे चिप उत्पादक अमेरिकन कंपनी एनव्हिडियाला सोमवारी आपल्या बाजारमूल्यापैकी सुमारे ६०० अब्ज डॉलर्स (४८२ अब्ज पौंड) गमवावे लागले आहेत, जे अमेरिकेच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात मोठे नुकसान आहे. सोमवारी या अमेरिकन कंपनीच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांची घसरण झाली.
तर दुसरीकडे एआय च्या क्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व तर धोक्यात आले आहेच, शिवाय त्याच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान होत असल्याने चीनचे तांत्रिक तज्ज्ञ खूश आहेत. चिनी तंत्रज्ञान अधिकारी डीपसीकला विध्वंसक शक्ती म्हणत आहेत. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्ष आणि व्यापार युद्धात हा नवा बॉट भाग्यबदल घडवून आणणारा ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.
संबंधित बातम्या