मुंबईतील एका रहिवाशाने ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता गुजरातच्या जामनगरमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाने बुधवारी (१९ जून) चिप्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक सापडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने खळबळ माजली असून पालिका प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
जामनगर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणीचा एक भाग म्हणून पॅकेटच्या उत्पादन बॅचचे नमुने गोळा केले जातील. बालाजी वेफर्स निर्मित क्रन्चेक्सच्या (Crunchex) पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळल्याची माहिती जॅस्मिन पटेल नावाच्या महिलेने दिली आहे.अन्न सुरक्षा अधिकारी डी. बी. परमार यांनी सांगितले की, काल रात्री आम्ही संबंधित दुकानाला भेट देऊन चौकशी केली. ज्या दुकानातून चिप्स खरेदी केले होते. हा खरोखरच कुजलेल्या अवस्थेत बेडूक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार या वेफर पाकिटांचे नमुने गोळा करून चौकशी करण्यात येणार आहे.
जामनंगरमधील पुष्कर धाम सोसायटीत राहणाऱ्या पटेल यांनी दावा केला की, त्यांच्या चार वर्षांच्या भाचीने १८ जून रोजी संध्याकाळी जवळच्या दुकानातून हे पाकीट विकत आणले होते. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या भाचीला मृत बेडूक दिसण्यापूर्वी त्यांची भाची आणि नऊ महिन्यांची मुलगी चिप्स खात होते.
"माझ्या भाचीने पाकीट फेकून दिलं. जेव्हा तिने मला सांगितले तेव्हा माझा तिच्यावर विश्वास बसला नाही. पण मृत बेडूक पाहून मलाही धक्काच बसला. बालाजी वेफर्सच्या वितरक आणि कस्टमर केअर सर्व्हिसने समाधानकारक उत्तर न दिल्याने मी सकाळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली, असे पटेल यांनी सांगितले.
मुंबईतील एका डॉक्टर तरुणाला आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट आढळल्याच्या घटनेची देशभरात चर्चा झाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला होता. आता मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती आली आहे. हे तुटलेलं बोट आइसक्रीमच्या कारखान्यातील कर्मचाऱ्याचं असल्याचा संशय आहे.
हे तुटलेलं बोट आइसक्रीम जिथं बनली, त्या पुण्यातील कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं असल्याचं समोर आलं. या कर्मचाऱ्याच्या बोटाला अपघातात दुखापत झाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी या कर्मचाऱ्याचा अपघात झाला, त्याच दिवशी हे आइसक्रीम पॅक करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या