देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. असाच एक प्रकार केरळ राज्यात समोर आला आहे. एक १८ वर्षीय दलित तरुणीवर गेल्या पाच वर्षांत सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ६२ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले असून याप्रकरणी पोलिसानी ४४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. केरळ राज्यातील कोची शहरातील ही घटना आहे.
पीडित तरुणी अॅथलीट असून ती दलित समाजाची असल्याचे सांगितले जात आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत ६२ जणांनी तिचे लैंगिक शोषण केले. या ६२ आरोपींपैकी ५८ आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी ४४ आरोपींना गेल्या दोन दिवसांत अटक करण्यात आली आहे. उर्वरित १४ आरोपींनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे पोलिस उपअधीक्षक पी. एस. नंदकुमार यांनी सांगितले की, या गुन्ह्यांची कार्यपद्धती तपासली जात आहे. स्त्री-पुरुष जागृती कार्यक्रमादरम्यान पीडितने एका स्वयंसेविकेला आपबीती सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ती १३ वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या नराधमानेच तिला आपल्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ६२ पैकी चार आरोपी अल्पवयीन आहेत. भारतीय कायद्यानुसार दलित समाजाशी संबंधित बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आरोपींना लगेच जामीन मिळत नाही. मात्र, या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीचा जबाब समोर आलेला नाही.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारतात २०२२ मध्ये बलात्काराच्या ३१,००० हून अधिक घटनांची नोंद झाली आहे, परंतु शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या वर्षी कोलकात्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनेही देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर निदर्शने करण्यात आली होती.
संबंधित बातम्या