Central govt employee DA hike : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आज दिवाळी भेट मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई मदत (DR) या दोन्हीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
डीए हा सध्या सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतो, तर डीआर सर्व पेन्शनधारकांना लागू आहे. महागाईमुळं वाढत्या राहणीमानाच्या खर्चाशी वेतन किंवा पेन्शनचा मेळ घालणं हा दोन्ही भत्त्यांचा उद्देश आहे.
महागाई भत्ता वाढीची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) आधारे केली जाते. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील किरकोळ किमतीतील चढउतारांचा आढावा घेऊन हा निर्देशांक ठरवला जातो.
'कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर्स'नं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून डीए आणि डीआर वाढीची घोषणा करण्यास उशीर होत असल्याचं म्हटलं आहे. साधारणत: सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये डीए आणि डीआरमध्ये वाढ करते. त्याची अधिकृत काही दिवसांनंतर केली जाते. या मधल्या कालावधीची थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन व पेन्शनमध्येही नंतर मिळवून दिली जाते. उदाहरणार्थ, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढ जाहीर केली गेल्यास त्याआधीच्या तीन महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाते.
मीडियातील वृत्तानुसार, महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळतो. तो ५३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेली ४ टक्के वाढ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आली होती. नवी वाढ २ जुलै २०२४ पासून लागू होणार असून तीन महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारात दिली जाण्याची शक्यता आहे.