Cyclone Michaung News In Marathi: बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्गमुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह चेन्नई, ओडिशा, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळ आज १२ वाजेपर्यंत आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वारा ९० ते ११० प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथक तैनात करण्यात आहे. दरम्यान, मिचॉन्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, हे जाणून घेऊयात.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीसारख्या अनेक समास्यांना तोंड द्यावे लागले आहे. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिमाणी, २०४ रेल्वे आणि ७० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चेन्नई येथील विमान वाहतूक बंगळुरुच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ज्या भागात मिचॉन्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो, अशा ठिकाणी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
तामिळनाडूत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळाला. सोमवारी डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रलहून सुटणाऱ्या सहा ट्रेन-म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, कोयंबटूर कोवई एक्सप्रेस, कोयंबटूर शताब्दी एक्सप्रेस, केएसआर बेंगळूरु एसी डबल डेकर एक्सप्रेस, केएसआर बेंगळूरु बृंदावन एक्सप्रेस, तिरुपती सप्तगिरी एक्सप्रेस आदि रेल्वे रद्द करण्यात आल्या, अशी माहिती दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी. गुगनेशन यांनी दिली.
मिचॉन्ग चक्रीवादळाने दक्षिण भारतात धुमाकूळ घातला असून त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा फरक पडणार नाही. परतु, राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवस पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ हे हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातले सहावे आणि बंगालच्या खाडीतले चौथे वादळ आहे. म्यानमारने या चक्रीवादळाला मिचॉन्ग असे नाव दिले.
संबंधित बातम्या