cyclone fengal : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. तामिळनाडू व पुद्दुचेरीच्या किनारी भागात 'फेंगल' चक्रीवादळ धडकणार असून यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवरील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत ताशी ७० ते ८० किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे शुक्रवारी चेन्नईला येणारी आणि जाणारी तेरा उड्डाणे रद्द करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तिरुवरूर केंद्रीय विद्यापीठाचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, कुड्डालोर आणि पुद्दुचेरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राणीपेट, तिरुवन्नामलाई, वेल्लोर, पेरंबलुर, अरियालूर, तंजावूर, तिरुवरूर, मयिलादुथुराई आणि नागपट्टिनम जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आपत्ती व्यवस्थापन विभागाने २,२२९ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. तिरुवरूर आणि नागपट्टिनम जिल्ह्यात १६४ कुटुंबांतील ४७१ लोकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
हे चक्रीवादळ सध्या पुद्दुचेरीपासून ३५० किमी आग्नेय दिशेला आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. हे चक्रीवादळ शनिवारी कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यासह किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळतील, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. सध्या प्रशासन आणि मदत यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून किनारपट्टी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या