ओडिशा-बंगालमध्ये धडकणार दाना चक्रीवादळ; जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख लोकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे गाड्या रद्द
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ओडिशा-बंगालमध्ये धडकणार दाना चक्रीवादळ; जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख लोकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे गाड्या रद्द

ओडिशा-बंगालमध्ये धडकणार दाना चक्रीवादळ; जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख लोकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे गाड्या रद्द

Published Oct 24, 2024 06:06 AM IST

Cyclone dana updates : दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कमधील सूर्य मंदिर बंद करण्यात आले आहे.

ओडिशा-बंगालमध्ये आजपासून दाना चक्रीवादळाचा कहर! जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे रद्द
ओडिशा-बंगालमध्ये आजपासून दाना चक्रीवादळाचा कहर! जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे रद्द (HT_PRINT)

Cyclone dana updates: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दाना चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका हा बंगाल, ओडीशा, बिहार, झारखंड या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन पश्चिम बंगाल आणि ओडिशा सरकार सतर्क झाले आहे. दाना चक्रीवादळामुळे पुरीतील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कमधील सूर्य मंदिर बंद करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज २४ ऑक्टोबरच्या रात्री पासून २६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत भितरकनिका पार्क ते धामरा बंदर दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

ओडिशात अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट  

दाना चक्रीवादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी राहण्याची शक्यता आहे. हा वेग ताशी १२० किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडीशातील अनेक स्मारके, मंदिरे आणि संग्रहालये बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याशिवाय गंजम, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक, बालासोर, मयूरभंज, क्योंझर, ढेंकनाल, जाजपूर, अंगुल, खोर्धा, नयागड आणि कटक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे ओडिशा सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प आणि केंद्रपाडा जिल्ह्यातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान तात्पुरते बंद केले आहे.

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना लावले कामाला 

दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. माझी यांनी चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांतील चक्रीवादळ व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्याचे निर्देश मंत्र्यांना व यंत्रणेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उद्योगमंत्री संपदचंद्र स्वैन जगतसिंगपूर जिल्ह्याची, पंचायती राज मंत्री रबी नायक बालासोर, उच्च शिक्षणमंत्री सूरज सूर्यवंशी यांची भद्रक येथे आणि नगरविकास मंत्री के. सी. सिंह जगतसिंगपूर जिल्ह्याची देखरेख करणार आहेत. महापात्रा मयूरभंज जिल्ह्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.

लष्कर, नौदल,  तटरक्षदल तैनात  

आपत्ती व्यवस्थापनासाठी ओडिशात एनडीआरएफची २० तर पश्चिम बंगालमध्ये १४ पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाबरोबरच बचाव पथके, जहाजे आणि विमानेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, राज्यभरात पाच हजारांहून अधिक मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये लोकांसाठी पाणी, अन्न, दूध आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

२०० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या रद्द

ओडिशा सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी सहा अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध जिल्ह्यांमध्ये २८८ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. १४ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील २०० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

१० लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी

पश्चिम बंगालमध्येही संभाव्य आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तब्बल १० लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी प्रशंसणे केली आहे. पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा येथे दक्षता घेण्यात येत असून प्रशासनाकडून माइकद्वारे लोकांना चक्रीवादळाची माहिती दिली जात आहे. दक्षिण २४ परगण्यातील नामखाना, सागर बेट, पाथरप्रतिमा, बक्खली सह विविध किनारी भागात ही माहिती दिली जात आहे. नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर