Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. भद्रक जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असून बांसडा येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पहाटे चक्रीवादळाचा तडाखा सुरूच राहिल्याने अनेक झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशात सध्या ताशी १०० ते ११० ते १२० किमी वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. तर अनेक उड्डाणे रद्द करून काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासाने दिली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.
'दाना' चक्रीवादळ ताशी १० किमी वेगाने वायव्येकडे सरकले. हे चक्रीवादळ २५ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५.३० वाजता उत्तर किनारपट्टीवर २१.००° उत्तर अक्षांश आणि ८६.८५ अंश पूर्व रेखांशाजवळ स्थिर होते. धामरापासून वायव्येस २० किमी आणि हुबळीखाती नेचर कॅम्पपासून वायव्येस ४० किमी अंतरावर वादळचा केंद्रबिंदू आला. चक्रीवादळ येण्याच्या मार्गावर ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. पुढील १-२ तासांत हे वादळ जमिनीवर धडकणार असून हे चक्रीवादळ उत्तर ओडिशावरून पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत चक्रीवादळाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दाना चक्रीवादळाच्या आगमनाबाबत आयएमडी भुवनेश्वरच्या संचालिका डॉ. मनोरमा मोहंती म्हणाल्या, 'चक्रीवादळाने वायव्य भागात जोर धरला आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाचा परिणाम आज संपूर्ण ओडीशा राज्यावर दिसणार आहे. मात्र, उद्यापर्यंत हे चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे. ओडिशात चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबाबतही पूर्ण दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या साठी पुरेशा उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. माझी यांनी विशेष मदत आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारच्या तयारीची माहिती घेतली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण ५,८४,८८८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत हा आकडा सहा लाखांच्या पुढे जाऊ शकतो. चक्रीवादळामुळे मदत केंद्रात हलविण्यात आलेल्या ४,४३१ गरोदर महिलांपैकी १,६०० गरोदर महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. हे लोक चक्रीवादळ निवारा केंद्रांमध्ये राहत आहेत जिथे त्यांना अन्न, औषधे, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत.
संबंधित बातम्या