श्रद्धा वाळकर हत्या प्रकरण आठवतंय का? हैवान आफताबने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून जंगलात फेकून दिलं. दिल्लीतील या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता झारखंडमध्ये एका नराधम प्रियकराने श्रद्धा वाळकरप्रमाणेच आपल्या प्रेयसीचे अनेक डझन तुकडे केले. शरीराचे छोटे-छोटे तुकडे केल्यानंतर ते जनावरांना खाण्यासाठी जंगलात फेकून दिले.
२४ नोव्हेंबर रोजी जरियागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोरडाग गावातील लोकांना असे काही दिसले की, त्यांना धक्का बसला. एक भटका कुत्रा मानवी हात घेऊन फिरत होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. नरेश भेंगरा असे मारेकऱ्याचे नाव आहे. तो २५ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आधी प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप, मग दुसरं लग्न, बलात्कार आणि मग खून, ही संपूर्ण कहाणी तुम्हाला आंतरबाह्य हादरवून टाकणारी आहे.
गांगी कुमारी असे या मृत तरुणीचे नाव असून गांगी आणि नरेश लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नरेश हा मटण तोडण्याचे काम करायचा. दोघेही खुंटी येथील रहिवासी होते. दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेम इतकं वाढलं की दोघेही तामिळनाडूला जाऊन लिव्ह इनमध्ये राहू लागले. त्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण काही दिवसांपूर्वी नरेश झारखंडला परत आला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. गांगीला याबाबत काहीच माहिती नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे लग्नानंतर नरेश पुन्हा गांगीकडे राहायला गेला.
खूंटीचे एसपी अमन कुमार यांनी सांगितले की, दोघेही (नरेश आणि गांगी) ८ नोव्हेंबर रोजी खूंटी येथे पोहोचले. खरं तर गांगीला नरेशच्या घरी जायचं होतं. तिला त्याच्यासोबत रहायचं होतं. पण नरेश तयार नव्हता. त्याला घरी नेण्याऐवजी त्याने गांगीला जंगलात नेले. तिथे त्याने तिला थांबायला सांगितले आणि स्वत: कुठेतरी गेला. तो परत आला तेव्हा त्याच्याकडे धारदार शस्त्र होते. आधी त्याने आपल्या लिव्ह इन पार्टनरवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने स्कार्फने गळा दाबून तिची हत्या केली. आणि मग त्याने गांगीच्या शरीराचे तुकडे-तुकडे करायला सुरूवात केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गांगीचे सुमारे ४० ते ५० तुकडे केल्याचे सांगितले.
हत्येच्या दोन आठवड्यांनंतर म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी एक कुत्रा मानवी मृतदेहाचा तुकडा घेऊन जाताना दिसला. कुत्र्याच्या जबड्यात हात असल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक जंगलात पोहोचले तेव्हा मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले. एक बॅगही आढळली त्यामध्ये आधार कार्ड आणि काही सामान सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश हा मांस कापण्याचा व्यवसाय करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे.