bhopal Crime news : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नीसमोर 'काका' म्हटल्याने एका संतापलेल्या ग्राहकाने एका कापड दुकानदाराला मारहाण केल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित दुकानदाराने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
भोपाळच्या जटखेडी भागात साडीचे दुकान चालवणारे विशाल शास्त्री यांना त्यांच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने व त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याचा आरोप पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित असे आरोपीचे नाव असून ही घटना शनिवारी घडली. आरोपी रोहित हा पत्नीसह तक्रारदार विशाल यांच्या दुकानात साडी खरेदी करण्यासाठी गेला होता. या जोडप्याने बराच वेळ अनेक साड्या पाहिल्या, पण त्यांना कोणतीच साडी आवडली नाही.
यानंतर दुकानदार विशालने रोहितला किती किमती पर्यंत साडी खरेदी करायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावर रोहित म्हणाला, 'एक हजार रुपयांपर्यंत. तसेच मी या पेक्षाही महाग साडी खरेदी करू शकतो मला कमी लेखू नको असेही रोहित म्हणाला. त्यावर दुकानदार विशालने ग्राहक रोहित संबोधून म्हणाला, "काका, मी तुम्हाला इतरही चांगल्या दर्जाच्या साड्या दाखवतो." विशालने काका म्हटल्याने, रोहित संतापला. त्याने विशालला पुन्हा काका म्हणू नको असे म्हटलं. दरम्यान, यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला. काही वेळानंतर रोहित आपल्या पत्नीसह दुकानातून बाहेर पडला. थोड्याच वेळाने तो त्याच्या मित्रांसह दुकानात आला. त्याने विशालला दुकानाबाहेर ओढत रस्त्यावर आणले. व त्याला बेल्टने व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या विशालने जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन रोहित आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी मनीष राज सिंह भदौरिया यांनी सांगितले की, विशालला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रोहित आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.