उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक निरीक्षक शहीद झाला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण असतानाच आता जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अधिकाऱ्याला वीरमरण आले. दुडू भागात सीआरपीएफचे जवान नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सुरक्षा दलातील जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चमकम झाली, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बसंतगडच्या दुर्गम दुदू भागात दुपारी साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) सह सीआरपीएफवर गोळीबार केला. सीआरपीएफच्या १८७ व्या बटालियनचे इन्स्पेक्टर कुलदीप सिंग यांना गोळी लागली आणि नंतर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
संयुक्त गस्ती पथकाच्या जोरदार प्रत्युत्तराला सामोरे जाताना दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले असून, घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत असताना हा दहशतवादी हल्ला झाला आहे. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्यात २०१४ मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती.
परिसीमनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी ७४ मतदारसंघ सामान्य प्रवर्गासाठी, नऊ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आणि सात मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
केंद्रशासित प्रदेशात १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. मतमोजणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरवण्यात येईल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये बंडखोरी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या सुमारे ७० बटालियन (सुमारे ७०,००० जवान) कायमस्वरूपी तैनात आहेत. याशिवाय सीमेवर पाळत ठेवण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्करावर आहे.
अमरनाथ यात्रेसाठी खोऱ्यात पाठविण्यात आलेल्या निमलष्करी दलाच्या सुमारे ५०० कंपन्यांना (५० हजार जवान) निवडणुकीच्या कामासाठीही तेथेच थांबण्यास सांगितले जाऊ शकते.