मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CRPF जवानाचा ट्रेनिंग सेंटरमध्ये गोळीबार, पत्नी-मुलांसह स्वत:ला खोलीत केलंय बंद

CRPF जवानाचा ट्रेनिंग सेंटरमध्ये गोळीबार, पत्नी-मुलांसह स्वत:ला खोलीत केलंय बंद

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 11, 2022 11:09 AM IST

प्रशिक्षण केंद्रात असलेल्या फ्लॅटमधून हा जवान शस्त्र घेऊन बाल्कनीतसुद्धा फेरी मारतो. त्याला नियंत्रणात आणण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही.

जोधपूरमध्ये CRPF जवानाचा हवेत गोळीबार
जोधपूरमध्ये CRPF जवानाचा हवेत गोळीबार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

CRPF Jawan Firing: जोधपूरच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात जवानाने बेछूट गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने प्रशिक्षण केंद्रात बेछूट गोळीबार केला. यामुळे गोंधळाचे वातावऱण निर्माण झाले. जवान काही कारणांनी नाराज झाल्यानं गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:सह पत्नी आणि मुलांना एका खोलीत बंद करून घेतलं आहे. त्यानंतर हा गोळीबार केला आहे. तसंच जेव्हा कोणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करत होता. जवानासोबत खोलीत त्याची पत्नी आणि मुलगी आहे.

जोधपूर पूर्वच्या डीसीपी अमृता दुहान यांनी सांगितले की, "सीआरपीएफच्या एका जवानाने प्रशिक्षण केंद्रात स्वत:ला घरात बंद करून घेतलं आहे. त्याच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्य आहेत. तसंच त्याने गोळीबार सुरु केला आहे. त्याला कुणीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी गोळीबार करण्यात आला. "

सीआरपीएफ जवानाने गोळीबार का केला याची माहिती समजू शकली नाही. त्याला खोलीतून बाहेर येण्यासाठी समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरा त्याने गोळीबार केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फ्लॅटमधून हा जवान शस्त्र घेऊन बाल्कनीतसुद्धा फेरी मारतो. त्याला नियंत्रणात आणण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही. घटनास्थळी जवानाच्या इतर कुटुंबियांना बोलावण्यात आलं आहे.

गोळीबार करणाऱ्या सीआरपीएफ जवानाचे नाव नरेश जाट असं आहे. नरेश मूळचा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातला आहे. ३ वर्षांपासून तो जोधपूरच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात होता. नरेशला दारुचे व्यसन असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय त्याचा स्वभाव रागीट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुट्टी न मिळाल्यानं तो त्रासला होता. सुट्टीवरून DIG सोबत त्याचा वादही झाल्याचं समोर येतंय.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग