Crocodile Attacked Man in Rajasthan: राजस्थानमधील भरतपूर विभागातील करौलीयेथील करनपूर येथील चंबल नदीच्या काठावर धक्कादायक घटना घडली. शेळींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेलेल्या मेंढपाळवर मगरीने हल्ला केला. मेंढपाळ कसाबसा मगरीच्या तावडीतून सुटला. या घटनेत मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोतीलाल नाथ (वय, ५७) असे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेंढपाळचे नाव आहे. नाथ हे नदीकाठावरील गुलर घाटात शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले असता आधीच शिकारीच्या शोधात बसलेल्या १० फूट लांबीच्या मगरीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नाथ यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी करणपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथ यांच्या पायाला आठ टाके घालण्यात आले आहेत. मात्र, मगरीशी झालेल्या झटापटीत त्यांना जबर मुक्का मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाथ यांच्यावर मगरीने केलेल्या हल्ल्याने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मोतीलाल नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरीने त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांना वाटले की ते आता जिवंत राहणार नाहीत. मात्र, तरीही त्यांनी मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. या झटापटीदरम्यान त्यांनी मगरीच्या डोळ्यात बोट घातले. ज्यामुळे मगरीची पकड सुटली. त्यानंतर नाथ यांनी तेथून पळ काढला आणि मदतीसाठी दीकाठावर आरडाओरडा केला. नाथ यांचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले.