मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बुधवारी संध्याकाळचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेसोबत अश्लीलता करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेला दारू पाजली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तिला धमकावून त्याने पळ काढला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडित महिलेला पोलिस ठाण्यात आणण्यात आले, तेथे ति्च्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद करत तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने सांगितले की, तरुण दारुच्या दुकानाजवळ भेटला होता. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि धमकी देऊन पळून गेला. महिलेचा जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
कोतवालीचे सीएसपी ओमप्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, उज्जैनमधील कोयला फाटक येथील दारूच्या दुकानाजवळ बलात्काराची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओची दखल घेत महिलेच्या तक्रारीवरून महिलेला पोलिस ठाण्यात आणून तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी लिहिलं की, 'धर्माची नगरी उज्जैन पुन्हा एकदा कलंकित झाली आहे. यावेळीही कायदा व सुव्यवस्थेच्या कपाळावर काळा टीळा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मूळ गावी अशी परिस्थिती असेल तर उर्वरित राज्यातील परिस्थिती सहज समजू शकते. दलित आणि आदिवासी महिलांवरील सततचे अत्याचाराची कल्पना करू शकता.
तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरात एका रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर बलात्कार व तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे जातीय तणाव निर्माण झाला असून प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली आहे. अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जैनूर शहरात कलम १६३ बीएनएसएस अंतर्गत जमावबंदी आदेश जारी करण्यात आले असून या भागात इंटरनेट बंद करण्यात आले आहेत.