हिमाचल प्रदेशात सध्या 'समोसे' हा चांगला राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्री आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी मागवण्यात आलेले समोसे सुरक्षा अधिकाऱ्यांनी मध्येच फस्त केल्यामुळे याप्रकरणी सीआयडी चौकशी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील विरोधकांनी समोस्यांच्या चौकशीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना याप्रकरणी प्रथमच स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. राज्यातील प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सुक्खू यांनी सांगितले.
सुक्खू म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांनी दाखवल्याप्रमाणे समोसे कुणी खाल्ले याचा सीआयडी तपास होणार नाही. तर अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा शोध घेण्यासाठी तपास करण्यात येणार आहे. या मुद्द्यावरून भाजपने माझ्यावर केलेला हल्ला हा बालिश आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यापासून भाजप माझ्याविरोधात बदनामीची मोहीम राबवत आहे’ असं सुक्खू म्हणाले.
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी आधीच स्पष्टीकरण दिले असल्याचे मुख्यमंत्री सुक्खू म्हणाले. अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा सीआयडी तपास करण्याता येणार आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी सीआयडीच्या तपासाला समोशात रुपांतरित केले. माझे सरकार पाडण्यासाठी भाजपने राबवलेले 'ऑपरेशन लोटस' अपयशी ठरल्यानंतर सरकार पाडण्यासाठीची भाजपची मोहीम सुरूच असल्याचा आरोप मुख्यमंत्री सुक्खू यांनी केला.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार २१ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी सीआयडीच्या ऑफिसला भेट दिली होती. त्यावेळी सूक्खूंसाठी मागवण्यात आलेले समोसे आणि केक त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी समोसे आणि केक खाल्ल्याचं बोललं जातं. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती वादाच्या भोवऱ्यात सापडली. अखेर या घटनेला सरकारविरोधी कृत्य म्हणून संबोधण्यात आल्याने त्याची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात सीआयडी मुख्यालयात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सुक्खू गेले होते. तेथील अधिकाऱ्यांनी लक्कर बाजारमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमधून जेवणाचे तीन बॉक्स आणले गेले होते. मात्र, त्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नाश्ता देण्यात आल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे.
दरम्यान, सीआयडी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चौकशी अहवालात नाव असलेल्या सर्व व्यक्तींनी सीआयडी विरोधी आणि सरकारविरोधी काम केले आहे. ज्यामुळे सीआयडी मुख्यालयात आलेल्या अती महत्वाच्या व्यक्तींना ते खाद्यपदार्थ देता आले नाही.
या प्रकरणावरून भाजपने हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री सुक्खू यांच्या प्रशासनाला राज्याच्या विकासाची चिंता नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या समोशाची चिंता असल्याचं भाजपने म्हटले आहे.